मुंबई : मार्चनंतर कोरोना रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठल्याने भारतात वैद्यकीय साहित्याचा तुटवडा जाणवू लागला. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरअभावी शेकडो रुग्णांना जीव गमवावा लागला. भारताला या संकटातून बाहेर काढण्यासाठी सध्या देश-विदेशातून मदतीचा ओघ सुरू आहे. गेल्या २० दिवसात मुंबई विमानतळावर विविध देशांतून ३८७ टन वैद्यकीय मदत दाखल झाली आहे.
मुंबई विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २६ एप्रिलपासून विविध २० ठिकाणांवरून ११० विमानांच्या मदतीने ३८७ टन वैद्यकीय सामग्री मुंबईत आणण्यात आली. त्यात १७ हजार ७०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ३ लाख १९ हजार ८०० रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि १ लाख १३ हजार ९०० टोसिलीझुमॅब औषधांचा समावेश आहे.
२६ एप्रिल ते १४ मेपर्यंत सिंगापूर, मॉरिशस, नेदरलँड, इंडोनेशिया, चीन, स्कॉटलंड, दक्षिण कोरिया, मलेशिया, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, पोलंड, तुर्की, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, दुबई, थायलँड, कॅलिफोर्निया, हाँगकाँगसह २० देशांतून ही मदत मुंबई विमानतळावर आणण्यात आली आहे. त्यासाठी एकूण ११० विमानांचा वापर करण्यात आला आहे. मुंबई विमानतळाने वैद्यकीय सामग्रीच्या साठवणुकीसाठी तापमान नियंत्रण, कोल्ड झोन (शीत विभाग) अशी विशेष यंत्रणादेखील तयार केली आहे.