CoronaVirus: के पश्चिम वॉर्डमध्ये कोरोनाचे ३९ रुग्ण; २१ भाग केले लॉकडाऊन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 08:06 PM2020-04-05T20:06:31+5:302020-04-05T20:07:00+5:30
पालिकेने ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळले आहेत, असे या वॉर्डमधील २१ भाग सील केले आहेत.
मनोहर कुंभेजकर
मुंबई- के पश्चिम वॉर्डमध्ये कोरोनाचे ३९ रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे. मुंबईतील २४ वॉर्डपैकी पालिकेच्या नकाशावर कोरोनाबाधित के वॉर्ड झाला आहे. या वॉर्डमध्ये आतापर्यंत ३ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर २ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. पालिकेने ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळले आहेत, असे या वॉर्डमधील २१ भाग सील केले आहेत. या ठिकाणी पालिकेने निर्जंतुक फवारणी केली आहे. के पश्चिम वॉर्डचे प्रभाग समिती अध्यक्ष अनिष मकवानी यांनी लोकमतला ही धक्कादायक आकडेवारी दिली. विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम व जोगेश्वरी पश्चिम असा विस्तीर्ण पसरलेल्या पालिकेच्या के पश्चिम वॉर्ड आहे. या वॉर्डामध्ये अंधेरी पश्चिम व वर्सोवा असे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. या दोन मतदारसंघांची लोकसंख्या संख्या सुमारे ५ लाख ८०००० च्या आसपास आहे. तर या वॉर्डमध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे.
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार अमित साटम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, येथील रेशनिंगची व्यवस्था संपूर्णपणे कोलमडली असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. येत्या १५ एप्रिलनंतर शासन मोफत धान्य वितरण करण्यापेक्षा आता वेळीच गरजू नागरिकांना धान्य वाटप करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच लोकप्रतिनिधींना फवारणी करण्यापासून रोखण्याचा शासनाचा निर्णय देखील चुकीचा आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवा आपल्याला येथील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी फोन केला असता आपण त्यांना या बाबी आपण सांगितल्याचे आमदार साटम म्हणाले.
येथील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ज्या भागात कोरोना रुग्ण सापडले आहेत, त्या भागात आणि विशेष करून झोपडपट्ट्यांमध्ये लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की,वर्सोवा विधानसभा मतदारसंघाची कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दूरध्वनी करून येथील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. आपण व आपले कार्यकर्ते येथील नागरिकांना धान्य वाटप जरी करत असलो तरी, येथे धान्य वाटपाची नितांत गरज असून धान्य वाटपासाठी आमदार निधी देण्याची मागणी त्यांनी आमदार लव्हेकर यांनी केली.
प्रभाग समिती अध्यक्ष अनिष मकवानी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, येथील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीशी सामना करण्यासाठी लोकप्रतिनधी व पालिका प्रशासन यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आम्ही नागरिकांशी थेट संपर्कात असतो, मात्र पालिका प्रशासन आमच्या सूचनांची अंमलबजावणी करत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
पालिका प्रशासन माहितीच देत नाही !
के पश्चिम वॉर्डामध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर असता, येथील सहाय्यक पालिका आयुक्त विश्वास मोटे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. गुलनार खान यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने, संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दाद दिली. नाहीतर डॉ. गुलजार यांच्या सहकाऱ्याने, अभी साहाब मिटींग मे है, आपको इन्फॉर्मेशन देना है क्या? यह मैं पुछके आपको बताती हू, पण त्यांचा परत काही फोन आला नाही.