मुंबई – मुंबईत सोमवारी ३९५ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या ५ हजार ७७६ झाली आहे. शहर उपनगरात सोमवारी सर्वाधिक १५ मृत्यूंची नोंद झाली असून बळींचा आकडा २१९ वर झाला आहे. एका बाजूला कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूला मुंबईतील १२५ ज्येष्ठ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत, आणि दिलासादायक बाब म्हणजे मुंबईत आता प्लाझ्मा थेरपीही सुरु झाली आहे.
मुंबईतील १५ मृत्यूंपैकी १० रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील ८ रुग्ण पुरुष व ७ महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी तिघांचे वय ४० वर्षांखालील होते. चौघांचे वय ६० वर्षांवर होते, तर उर्वरित आठ रुग्ण ४० ते ६० वर्षांदरम्यान होते. मुंबईत सोमवारी ११८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर आजपर्यंत १०१५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण डिस्चार्ज रुग्णांपैकी १०० रुग्ण हे मुंबईबाहेरील आहेत, जे मुंबईतील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होते.
मुंबईत २२ व २३ एप्रिल पर्यंतच्या प्रयोगशाळांचे झालेल्या १०७ कोरोना (कोविड-१९) चाचणी अहवाल सोमवारी प्राप्त झाले आहेत. या रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. पालिकेच्या विविध रुग्णालयांत सोमवारी ४३३ संशयित कोरोना रुग्ण दाखल झाले, तर आजवर ८ हजार ७२४ रुग्ण भरती झाले आहेत.
गोरेगावमध्ये नवीन कोरोना हेल्थ सेंटरमुंबई महानगरपालिकेने गोरेगाव येथील नेस्को मैदान येथे १२०० खाटांचे नवीन कोरोना हेल्थ सेंटर उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यापैकी १००० खाटांमध्ये आक्सिजन देण्याची सुविधा आहे.
राज्यात २७ मृत्यूंची नोंद, बळींचा आकडा ३६९ वरराज्यात सोमवारी झालेल्या मृत्यूंपैकी १५ पुरुष तर १२ महिला आहेत. या २७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १३ रुग्ण आहेत तर ८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ६ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या २७ रुग्णांपैकी २२ जणांमध्ये (८१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यातील एकाला एच आय व्ही तर एका रुग्णाला कर्करोग होता. राज्यात सध्या ५७२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ७८६१ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ३२.२८ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.