मुंबई : सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले असले तरी कोरोनाची दहशत कायम आहे. त्यामुळे आजही ४० टक्के ग्राहक दैनंदिन गरजांसाठी आवश्यक असलेले बहुतांश साहित्य होम डिलिव्हरीच्या माध्यमातूनच मिळवत आहेत. त्यांची भिस्त ई कॉमर्स किंवा स्थानिक पातळ्यांवरील रिटेल स्टोअर्सवर आहे. परंतु, त्या सामानाच्या किमती, ते मिळविण्यासाठी करावी लागणारी प्रतीक्षा आणि वस्तू बदलण्यासाठी करावा लागणारा खटाटोप हा त्रासदायक ठरतोय, असे मत त्यापैकी ६५ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे.देशातील आॅनलाइन सर्वेक्षणात अग्रेसर असलेल्या लोकल सर्कल या संस्थेने २३१ जिल्ह्यांतील २५ हजार लोकांची मते जाणून घेतल्यानंतर हा निष्कर्ष काढला आहे. त्यात ६१ टक्के पुरुष तर ३१ टक्के महिलांचा समावेश आहे. ७७ टक्के मते ही महानगरांतील रहिवाशांनी नोंदविली आहेत. तर, उर्वरित सहभाग उपनगरे आणि छोट्या शहरांतील आहे. मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर ई कॉमर्सच्या व्यवहारांवरही बंदी होती. त्यामुळे स्थानिक पातळीवरील विक्रेत्यांवरच अवलंबून राहावे लागत होते. १५ एप्रिलपासून लागू झालेल्या लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात ई कॉमर्सवरील निर्बंध शिथिल झाले. त्यानंतर आवश्यक आणि अत्यावश्यक वस्तूंच्या होम डिलिव्हरीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. या वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढल्याने घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी झाले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ७१ टक्के लोकांना घराबाहेर पडल्यानंतर कोरोनाची लागण होण्याची भीती वाटते. तर ६ टक्के लोकांना आॅनलाइन खरेदी सोयीची वाटते.
coronavirus: कोरोनाच्या भीतीपोटी तब्बल ४० टक्के ग्राहक घेतात बहुतांशी सामान घरपोच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 3:19 AM