Coronavirus : पालिकेच्या तपासणी मोहिमेत ५२८ जणांना केले क्वारंटाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 07:17 AM2020-03-17T07:17:32+5:302020-03-17T07:17:49+5:30
दोन दिवसांत १०६७ वैद्यकीय पथकांनी शहर-उपनगरांतील ५२८ जणांना होम क्वारंटाइन केले आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले असून आतापर्यंत १० हजार २७ निवासी वसाहतींमध्ये जाऊन तपासण्या केल्या आहेत. दोन दिवसांत १०६७ वैद्यकीय पथकांनी शहर-उपनगरांतील ५२८ जणांना होम क्वारंटाइन केले आहे. दरम्यान, बी, डी आणि एम डब्ल्यू या विभागांत एकाही व्यक्तीला होम क्वारंटाइन केलेले नाही, असे आरोग्य विभागाने कळविले.
शहर उपनगरात गोरेगाव परिसरात ‘पीएन’ विभागात ६८ व्यक्तींना, तर बोरीवली परिसरात ‘आरसी’ विभागात ५९ जणांना आणि अंधेरीतील ‘केडब्ल्यू’ विभागात ५६ जणांना होम क्वारंटाइन केले आहे. आतापर्यंत पालिकेच्या वैद्यकीय पथकाने १० हजार २७ वसाहतींतील २५४ घरांना भेटी देऊन तपासण्या केल्या.
ताप, कफ, सर्दी, खोकला, श्वसनास त्रास असलेल्या नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. शिवाय, होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्तींच्या हातावर एक शिक्का मारण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
होम क्वारंटाइन म्हणजे घरगुती अलगीकरण
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पालिकेच्या वतीने प्रवासाचा इतिहास असणाऱ्यांचे ‘होम क्वारंटाइन’ म्हणजे घरगुती अलगीकरण केले आहे. यासाठी हवा खेळती राहील अशी खोली हवी, यात टॉयलेटही असावे. त्याच खोलीत आणखी कुणी असेल तर त्यांच्यामध्ये १ मीटर अंतर असावे. दोन्ही व्यक्तींनी घरातील वृद्ध आणि गरोदर स्त्रिया, मुलांपासून दूर राहावे. संशयिताने समारंभ, लग्न, पार्टी अशा कार्यक्रमांत १४ दिवस किंवा पूर्ण बरे होईपर्यंत जाऊ नये. साबणाने हात धुवावेत तसेच सर्जिकल मास्क लावावा.