CoronaVirus: मुंबईत ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण; महापौर होम क्वारंटाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 06:09 AM2020-04-21T06:09:25+5:302020-04-21T06:09:41+5:30
सायन प्रतीक्षानगर येथील पत्रकार राहत असलेली इमारत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर
मुंबई : शहर उपनगरातील ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांची रवानगी गोरेगाव येथील विलगीकरण कक्षामध्ये करण्यात आली आहे, तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरदेखील होम क्वारंटाइन झाल्या आहेत.
वृत्तवाहिनी, संकेतस्थळ वा वर्तमानपत्रांचे पत्रकार, कॅमेरामन, छायाचित्रकार हे सतर्क राहून शहर-उपनगरातील कोरोनाविषयक वार्तांकन करत होते. या पत्रकारांसाठी मुंबई महापालिकेने नुकतेच आरोग्य तपासणी शिबिर घेतले होते. त्यामध्ये १६८ जणांची चाचणी केली. त्यापैकी ५३ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामधील अनेकांना कोरोनाची लक्षणेदेखील नव्हती. सायन प्रतीक्षानगर येथील पत्रकार राहत असलेली इमारत सोमवार दुपारनंतर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली असून हा परिसर सील करण्यात आला आहे, तर पत्रकारांच्या कुटुंबीयांना १४ दिवस विलगीकरण सांगण्यात आले आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र, पत्रकारांची चाचणी करताना महापौरदेखील उपस्थित होत्या आणि त्या अनेक पत्रकारांच्या संपर्कातदेखील आल्या आहेत. त्यामुळे त्या स्वत: होमक्वारंटाइन झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले आहे.