CoronaVirus : राज्यात कोरोना संदर्भात ५७ हजार गुन्हे दाखल, १२ हजार व्यक्तींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 08:41 PM2020-04-20T20:41:28+5:302020-04-20T20:41:56+5:30
CoronaVirus : राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाइन असा शिक्का आहे, अशा ५७२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.
मुंबई : राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते १९ एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८नुसार ५७, ५१७ गुन्हे दाखल झाले आहेत. तर १२,१२३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहेत. तसेच, ४०,४१४ वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस विभागाच्यावतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.
उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ७३,३४४ फोन आले. त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाइन असा शिक्का आहे, अशा ५७२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १०५१ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्याभरात नोंदविले आहेत. या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी २० लाख (२ कोटी २० लाख) रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पोलीस अधिकारी व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील २४ तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने ११पोलीस अधिकारी व ३८ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या ११७ घटनांची नोंद झाली असून यात ४११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.