coronavirus: परदेशात अडकलेले ५७२ भारतीय मुंबईत  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 07:13 AM2020-05-11T07:13:52+5:302020-05-11T07:14:25+5:30

लंडनहून आलेल्या ३२९ प्रवाशांमध्ये पुणे येथील ६५, अमरावती, अकोला, औरंगाबाद, बीड, गोवा व गोंदिया येथील व मुंबईतील २४८ प्रवासी यांचा समावेश होता. मुंबईतील प्रवाशांना विविध हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे.

coronavirus: 572 Indians stranded abroad in Mumbai | coronavirus: परदेशात अडकलेले ५७२ भारतीय मुंबईत  

coronavirus: परदेशात अडकलेले ५७२ भारतीय मुंबईत  

Next

मुंबई : परदेशात अडकलेले ५७२ भारतीय रविवारी मुंबईत दाखल झाले. लंडनहून एअर इंडियाच्या एआय १३० या विशेष विमानाने रविवारी पहाटे दीड वाजता ३२९ प्रवासी तर सिंंगापूर येथून दुपारी साडेबाराला आलेल्या विमानातून २४३ प्रवाशांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर या प्रवाशांचे स्वागत करून त्यांना विमानतळ प्रशासनाद्वारे आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात आल्या.
लंडनहून आलेल्या ३२९ प्रवाशांमध्ये पुणे येथील ६५, अमरावती, अकोला, औरंगाबाद, बीड, गोवा व गोंदिया येथील व मुंबईतील २४८ प्रवासी यांचा समावेश होता. मुंबईतील प्रवाशांना विविध हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. या सर्व प्रवाशांनी (दोन-तीन जणांचा अपवाद वगळता) आरोग्य सेतू अ‍ॅप डाउनलोड केले. या प्रवाशांना त्यांच्या विहित स्थळी पोहोचवण्यास मुंबईत बेस्ट बस व मुंबईबाहेर एसटी बसची व्यवस्था करण्यात आली होती.
जगभरात विविध देशांत अडकलेल्या १४ हजार ८०० भारतीयांना भारतात हवाई मार्गे आणले जात आहे. यापैकी २ हजार ३५० भारतीय प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर १० विमानांद्वारे उतरणार आहेत. या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विमानतळ प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या आहेत. लंडन, अमेरिका, सिंगापूर, मलेशिया, बांगलादेश, फिलिपाइन्स यासह विविध देशांत अडकलेल्या भारतीयांना विशेष विमानांनी भारतात आणले जात आहे. विमानतळावर यासाठी दोन स्वतंत्र एरोब्रिज तयार करण्यात आले असून वैद्यकीय प्रक्रियेद्वारे प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग व तपासणी केली जात असून त्यानंतर त्यांना इमिग्रेशन विभागात प्रवेश दिला जातो.
प्रत्येक प्रवाशाला किमान दोन मीटर अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. फेस मास्क परिधान करणे व सॅनिटायझर्सचा वापर करणे या प्रवाशांना बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवाशांना विमानतळावरून लवकर बाहेर पडता येणे शक्य व्हावे यासाठी ३० इमिग्रेशन काउंटर सुरू करण्यात आले आहेत. कोरोनाची लक्षणे नसलेल्या मुंबईतील प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार मुंबईत विविध हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात येत आहे. तर मुंबईबाहेरील प्रवाशांना त्यांच्या जिल्ह्याच्या मुख्यालयात पोहोचवण्याची व्यवस्था राज्य सरकारने केली आहे. त्यासाठी मदत कक्ष तयार करण्यात आला आहे.
रविवारी रात्री उशिरा मनिला येथून तर सोमवारी पहाटे पावणेपाच वाजता सॅन फ्रान्सिस्को व सायंकाळी साडेसहा वाजता ढाका येथून विमानातून प्रवासी येणार आहेत.

Web Title: coronavirus: 572 Indians stranded abroad in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.