मुंबई – कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी संपूर्ण देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र या लॉकडाऊन काळात वैद्यकीय उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रचंड हाल होतानाही समोर येत आहे. मुंबईच्या एका झोपडपट्टीत राहणाऱ्या ६० वर्षीय वडिलांनी तिच्या आजारी मुलीला खांद्यावर घेऊन हॉस्पिटलपर्यंत घेऊन गेल्याचं धक्कादायक माहिती समोर आली.
६० वर्षीय वृद्ध वडील आपल्या १७ वर्षाच्या मुलीला खांद्यावरुन भरदुपारच्या उन्हात पायी चालत जात होता. हा फोटो पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल. लॉकडाऊनमुळे देशभरात सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प आहे. सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने सामान्य रुग्णांचे असे हाल होताना पाहायला मिळत आहेत. अशातच आजारी पडलेल्या मुलीला मोहम्मद रफी नावाच्या वडिलांनी आपल्या खांद्यावर घेऊन २६ किमी अंतर पायी प्रवास केला. त्यानंतर या मुलीला केईएम रुग्णालयात दाखल केलं आणि पुन्हा पायी परतला.
गोवंडीच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मोहम्मद रफी यांच्यासोबत हा प्रकार घडला. ते कूक म्हणून काम करतात पण लॉकडाऊनमुळे त्यांचे काम ठप्प पडले आहे. गुरुवारी मोहम्मद रफी यांच्या मुलीच्या पोटात अचानक दुखू लागले. त्यामुळे तिला अंथरुणातून उठताही आलं नाही. मुलीला होणारा त्रास बापाला पाहता आला नाही अखेर त्यांनी आपल्या कमकुवत खांद्यावर मुलीला घेतलं आणि भर उन्हात गोवंडी ते परेळ असा पायी प्रवास केला.
मोहम्मद रफी यांनी मुलीला खांद्यावर घेऊन जवळपास २६ किमी अंतर पायी पार केले. त्यानंतर या मुलीला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात पोहचता पोहचता रफी यांचे अंग कापू लागले होते. हलक्या आवाजात त्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे पैसे नाहीत, काम बंद पडलं आहे. अडचणीत घरातील जीवनावश्यक सामान आणणंही कठीण झालं आहे. केईएम रुग्णालयात रफी यांच्या मुलीवर उपचार झाल्यानंतर पुन्हा मुलीला आपल्या खांद्यावर बसवून त्यांनी घरापर्यंतचा पायी प्रवास केला. कोरोना संक्रमण तोडण्यासाठी लॉकडाऊन ठेवणं गरजेचे असले तरी याची झळ सर्वसामान्यांना बसत असल्याचं उदाहरण यातून समोर येते.
आणखी वाचा...
सावधान! आता पीएफ अॅडव्हान्स काढाल तर 10 वर्षांनी पस्तावाल
मुलगा झाला म्हणून अख्ख्या पंचक्रोशीत बत्ताशे, लाडू वाटले; निघाला कोरोना पॉझिटिव्ह
विखारी पाकिस्तान! भारताविरोधात मोठ्या सायबर युद्धाला सुरुवात
कोरोनाचे दुष्परिणाम; तब्बल २५ कोटी बळी जाण्याची भीती