Join us

Coronavirus: दोन दिवसांत ६२ कोटींची मद्यविक्री; पण सरकारच्या निर्णयामुळे पोलिसांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 3:30 AM

राज्यातील काही जिल्ह्यांत दुकाने बंदच

मुंबई : मद्यविक्रीवरील बंधने उठवताच अवघ्या दोन दिवसात राज्यात ६२ कोटी ५५ लाखांची १६ लाख १० हजार बल्क लीटर दारु विक्री करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

सोमवारी सुमारे १२ कोटी रुपयांची मद्यविक्री झाली. जेथे दुकाने सुरू होीत, अशा भागांत सकाळपासूनच दारू खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. चार-चार तास रांगेत थांबून अनेकांनी दारू खरेदी केली. कोणत्याही क्षणी पुन्हा दारूविक्री बंद होऊ शकते, असा अंदाज बांधून अनकांनी हजारो रूपयांची दारू खरेदी केल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या दुकानांच्या परिसरात प्रचंड गर्दी होऊ लागल्याने बंदोबस्त पुरवून रांगा लावण्याची वेळ आली. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची सूचना करण्यात आली. सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याची सूचना सतत दिली जात होती. गर्दी प्रचंड वाढल्याने राज्याच्या काही जिल्ह्यांतील मद्यविक्री दुसऱ्या दिवशी थांबवण्यात आली. मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयांनी मद्यविक्रीबाबतचे निर्देश सोमवारी दुपारी दिले. त्यानंतर मद्यविक्री सुरू झाली. काही ठिकाणी रांगेत उभे राहण्यावरून बाचाबाचीचे प्रकार घडले. अनेक दुकानदारांनी ग्राहकामागे किती दारू दिली जाईल, याचे प्रमाण ठरवून दिल्याने काही ग्राहक पुन्हापुन्हा रांगेत उभे रहात असल्याचेही पाहायला मिळाले.

दरम्यान, तळीराम मोठ्या संख्येने वाइन शॉपसमोर उभे असल्याने पोलिसांच्या कामाचा ताण वाढला. पोलिसांना रस्त्यावर, उन्हातान्हात उभे राहावे लागत असल्याने त्यांच्यामध्ये सरकारच्या या निर्णयाबाबत तीव्र नाराजीचे वातावरण आहे.१५ कोटींचा मिळाला होता महसूलसोमवारी राज्यात सुमारे १२ कोटी रुपये किमतीच्या तीन ते चार लाख लीटर दारूची विक्री झाली. साधारणत: राज्यात दिवसाला २४ लाख लीटर दारूची विक्री होते. मात्र राज्याच्या विविध भागांत मद्यविक्री सुरू झालेली नसल्याने तीन ते चार लाख लीटर विक्री झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी दिली. २०१९-२० या आर्थिक वर्षात राज्याला दारूतून १५ हजार ४२८ कोटी महसूल मिळाला होता.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस