CoronaVirus News: मुंबईत कोविड केअर सेंटरमधील ६७ हजार खाटा रिकाम्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 06:24 AM2020-08-12T06:24:53+5:302020-08-12T07:30:49+5:30

कोरोनाचा प्रसार येतोय नियंत्रणात; आता केवळ जम्बो फॅसिलिटी सेंटर राहणार सुरू

CoronaVirus 67000 beds in covid Care Center in Mumbai are empty | CoronaVirus News: मुंबईत कोविड केअर सेंटरमधील ६७ हजार खाटा रिकाम्या

CoronaVirus News: मुंबईत कोविड केअर सेंटरमधील ६७ हजार खाटा रिकाम्या

Next

मुंबई : कोरोनाचा प्रसार मुंबईत आता हळूहळू नियंत्रणात येत असल्याने रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या १९ हजार सक्रिय रुग्णांपैकी पाच हजार ४२६ रुग्ण कोविड केअर सेंटर अथवा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे एकूण ७३ हजार खाटांपैकी ६७ हजार ५७४ खाटा रिक्त असल्याने छोटी केंद्रे बंद करण्यात येत आहेत. मात्र जम्बो फॅसिलिटी सेंटर आणखी काही काळ सुरू राहणार आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर पालिका रुग्णालयात जागा कमी पडू लागली. मे महिन्याच्या अखेरीस बाधित रुग्णांची संख्या एक लाखाहून अधिक असेल, अशी भीती व्यक्त होत होती. त्यामुळे त्या प्रमाणात खाटा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिकेने छोटी-मोठी ४०३ कोरोना केअर सेंटर मुंबईत उभारली. यामध्ये एकूण ७३ हजार खाटा उपलब्ध करण्यात आल्या. मुंबईत कोरोनाचा प्रसार आता नियंत्रणात येत असून आतापर्यंत ९८ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत सध्या १९ हजार १९० सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्क्यांवर गेल्यामुळे कोरोना केअर सेंटरमधील खाटा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.

हॉटेल, शाळा, इमारतींमध्ये सुरू केलेली केंद्रे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येत आहेत. वांद्रे-कुर्ला संकुल, गोरेगाव नेस्को, ‘एनएससीआय’ वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स, दहिसर, मुलुंड येथील जम्बो हेल्थ सेंटर सुरू राहणार आहेत, अशी माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

अशी आहे सद्य:स्थिती
प्रत्येक प्रभागात दोन-चार केंद्रे सुरू ठेवण्यात येतील. रुग्णसंख्या वाढल्यास बंद केलेली आरोग्य केंद्रे तातडीने सुरू करता येतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
लक्षणे नसलेल्या आणि रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील संशयित व्यक्तींसाठी सुरू केलेल्या ‘कोरोना केअर सेंटर-१’ची संख्या तीनशे आहे. येथे ५० हजार खाटांची क्षमता आहे. यापैकी आता चार हजार जणांवर उपचार सुरू आहेत.
बाधित व लक्षणे असलेल्यांना क्वारंटाइन करण्यासाठी असलेल्या ७३ ‘कोरोना केअर सेंटर-२’ची क्षमता २३ हजार खाटांची आहे. यापैकी १४२४ खाटांवर रुग्ण आहेत.

Web Title: CoronaVirus 67000 beds in covid Care Center in Mumbai are empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.