- राज चिंचणकर मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मराठी नाट्यव्यवसाय अचानक बंद झाला आणि मराठी रंगभूमीच्या पडद्यामागे रोजंदारीवर काम करणारे; तसेच पूर्णवेळ नाट्य व्यवसायावर अवलंबून असणारे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले. यातून त्यांना सावरण्यासाठी मराठी नाटक समूहाने पुढाकार घेत, समाजमाध्यमांवर आवाहन केले आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. यातून या समूहाने निधी जमवत, पडद्यामागच्या २७५ रंगकर्मींना तब्बल ७ लाखांचे आर्थिक साहाय्य मिळवून दिले आहे.२२ बुकिंग कर्मचारी, १० चालक, ५ उपाहारगृह कर्मचारी, १० वेशभूषाकार, १५ द्वारपाल, २३ प्रकाशयोजनाकार, २६ रंगभूषाकार, २३ व्यवस्थापक, १६ संगीत विभाग कर्मचारी, १३ साहित्य विभाग कर्मचारी व ११२ नेपथ्य विभाग कर्मचारी अशी या रंगकर्मींची वर्गवारी आहे. या २७५ जणांमध्ये मुंबईव्यतिरिक्त, पुणे येथील २५ नेपथ्य रंगकर्मी, तंत्रज्ञ, बुकिंग क्लार्क आणि उपाहारगृह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.उपकार नव्हे; तर कर्तव्यभावनेतून मराठी नाटक समूहाने पडद्यामागच्या रंगकर्मींसाठी सुरू केलेल्या मोहिमेचा पहिला टप्पा आता पूर्ण झाला आहे. यात एकूण २७५ पडद्यामागच्या रंगकर्मींच्या थेट बँक खात्यांत प्रत्येकी अडीच हजारांची रक्कम जमा करण्यात आली आहे. ‘एक हात आपुलकीचा, विश्वासाचा, आपल्या माणसांना सावरण्याचा’ या उक्तीनुसार, मराठी नाटक समूहातील कुणीही प्रत्यक्षात एकमेकांना न भेटता, हा उपक्रम केवळ व्हॉट्सअॅपवर नियोजन करून यशस्वी केला असल्याची माहिती मराठी नाटक समूहाच्या वतीने आशीर्वाद मराठे यांनी दिली.
coronavirus: पडद्यामागच्या २७५ रंगकर्मींना ७ लाखांचे आर्थिक साहाय्य...!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 2:40 AM