मुंबई : कोरोनाचा सामना करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे कर्मर्चायांची शंभर टक्के उपस्थिती पालिका प्रशासनाने सक्तीची केली होती. मात्र कर्मचाºयांची होणारी गैरसोय, गर्दी आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर या संदर्भातील परिपत्रकात पुन्हा सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार आता ७५ टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थिती राहण्याची सक्तीची करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी २० मार्चपासून केवळ ५० टक्के कर्मचाºयांच्या उपस्थितीत पालिकेचा कारभार सुरू होता. मात्र यामुळे नागरी सेवा सुविधा ठप्प होत असल्याने शंभर टक्के कर्मचाºयांना कामावर हजर राहण्याचे परिपत्रक प्रशासनाने गेल्या आठवड्यात काढले होते. मात्र काही कर्मचारी मुंबई बाहेरून म्हणजे ठाणे, नवी मुंबई येथून येतात. रेल्वे वाहतूक बंद असल्याने या कर्मचाऱ्यांची प्रचंड गैरसोय होते. त्याच बरोबर अन्य महापालिकांनी प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे या कर्मचाºयांनी दररोज प्रवास करायचा कसा? असा सवाल कामगार संघटनांनी उपस्थित केला होता. त्यानुसार पालिका प्रशासनाने काढलेल्या सुधारित परिपत्रकात आता ७५ टक्के कर्मचाºयांना उपस्थिती सक्तीची करण्यात आली आहे.
२५ टक्के कर्मचाºयांवर ही जबाबदारी...७५ टक्के कर्मचाऱ्यांपैकी २५ टक्के कर्मचाऱ्यांना कोरोना रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. यामध्ये त्यांच्या घराजवळ ड्युटी देण्यात येणार आहे. त्यात विलगीकरण कक्षाचे व्यवस्थापन, पालिका रुग्णालयात खाटा, आॅक्सिजन व्यवस्था बघणे, बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांना शोधणे, मान्सूनपूर्व काम अशा कामांमध्ये त्यांचा सहभाग घेण्यात येणार आहे.