coronavirus: अन्य आजारांसाठीही ७,५०० खाटा राखीव , कोरोनाव्यतिरिक्त संसर्गासाठी उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 04:40 AM2020-05-15T04:40:00+5:302020-05-15T04:40:29+5:30
मुंबई : बहुतांश पालिका रुग्णालयातील खाटा कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे अन्य आजारांनी त्रस्त गरजू रुग्णांची ...
मुंबई : बहुतांश पालिका रुग्णालयातील खाटा कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे अन्य आजारांनी त्रस्त गरजू रुग्णांची गैरसोय होत आहे. यासाठी मुख्य रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने यांच्यासह खासगी नर्सिंग होममध्ये आता इतर आजारांनी त्रस्त रुग्णांकरिता सुमारे सात हजार ५००पेक्षा अधिक खाटांसह आवश्यक त्या सर्व उपचार सुविधा उपलब्ध आहेत. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १६ हजारांवर पोहोचला आहे, तर ६२१ लोकांचा मृत्यू झाला आहे. बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये बहुतांश खाटा या रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार या आजाराने त्रस्त रुग्णांना त्यांच्यावर उपचार करणारे रुग्णालय शोधण्याची वेळ येत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने आपल्या काही रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवल्या आहेत.
उपनगरात ३ हजार खाटा नर्सिंग होमची व्यवस्था
पालिकेच्या १७ उपनगरीय रुग्णालयांमध्ये आणखी तीन हजार ७६ खाटा नॉनकोविडसाठी राखीव आहेत. २७ प्रसूतिगृह मिळून ८९९ खाटा आहेत. अशा एकूण सात हजार ५१४ इतक्या खाटा आहेत.
पालिकेचे १८७ दवाखाने आणि एक हजार ४१६ खासगी नर्सिंग होमही इतर उपचारांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी इतर आजारांवरील उपचार, सेवा-सुविधांबाबत चिंता करू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
कोरोना वगळता इतर विविध आजारांबाबत उपचारांची सुविधा असलेली पालिकेची प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, प्रसूतिगृह, दवाखाने तसेच खासगी नर्सिंग होम इत्यादींचे विभागनिहाय नाव, पत्ता, संपर्क क्रमांक यांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच हेल्पलाइन क्रमांक १९१६वरही संपर्क साधता येईल.