Join us

Coronavirus: मुंबईत ८ हजार ३५९ कोरोना रुग्ण; दिवसभरात ५४७ रुग्ण तर २७ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2020 2:23 AM

राज्यात ३६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी शोध, निदान, आणि उपचार या त्रिसुत्रींवर मुंबईतही शहर उपनगरात यंत्रणा काम करत आहे. मुंबई शनिवारी ५४७ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून रुग्णसंख्येचा आकडा ८ हजार ३५९ वर गेला आहे. तर दिवसभरात २७ मृत्यू झाले असून बळींचा आकडा ३२२ झाला आहे. शहर उपनगरात १३७ जणांना डिस्चार्ज मिळाला असून दिवसभरात १ हजार ७०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईतील २७ मृत्यूंपैकी २० जणांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील २० रुग्ण पुरुष तर सात महिला होत्या. मृत्यू झालेल्यांपैकी १२ जणांचे वय ६० हून अधिक होते. तर उर्वरित १५ रुग्ण ४० ते ६० दरम्यानचे आहेत. शनिवारी झालेल्या रुग्ण निदानात २९ व ३० एप्रिल पर्यंतच्या १९० कोरोना चाचणी अहवालांचा समावेश केला आहे. मुंबईत शनिवारी ४८१ संशयित रुग्ण पालिकेच्या विविध रुग्णालयांत दाखल झाले, तर आता पर्यंत १०,९९५ जण दाखल आहेत.

राज्यात ३६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ५२१ झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २७, पुणे शहरातील ३, अमरावती शहरातील २, तर वसई विरार मधील १, अमरावती जिल्ह्यामधील १ तर औरंगाबाद मनपामधील १ मृत्यू आहे. या मृत्यूंपैकी २८ पुरुष तर ८ महिला आहेत. ३६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १९ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर एक जण ४० वर्षांखालील आहे. या रुग्णांपैकी २३ जणांत ७० टक्के मधुमेह, हृदयरोग, असे अतिजोखमीचे आजार आढळले.पुणे विभागात १२ जणांचा मृत्यूपुणे : पुणे विभागात दोन दिवसांत नवे १८२ कोरोना रुग्ण आढळले असून, १२ जणांचा मृत्यू झाला आहे. विभागात शुक्रवारी १०१, तर शनिवारी ८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ हजारच्या पुढे गेली आहे.विदर्भात दोन दिवसात ४० रुग्ण; चंद्रपुरातही शिरकावविदर्भात शुक्रवार व शनिवार या दोन दिवसात ४० रुग्णांची नोंद झाली. यात अमरावती जिल्ह्यात १३, नागपूर व अकोला जिल्ह्यात प्रत्येकी १२ व यवतमाळ जिल्ह्यात दोन रुग्णांचे निदान झाले. या रुग्णांसह विदर्भात रुग्णांची संख्या ३६१ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे चंद्रपुरातही कोरोनाचा शिरकाव झाला असून पहिल्यांदाच एका रुग्णाचे निदान झाले. तेथील ५० वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे निदान नीरीच्या प्रयोगशाळेने केले आहे.

भंडारा, गोंदिया व वाशिम जिल्ह्यात एक-एकच रुग्ण आहे, तर बुलडाण्यात आठवडाभरात एकाही रुग्णाची नोंद नाही. अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी तीन तर शनिवारी १० रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या ५३ वर पोहचली आहे. यवतमाळ जिल्ह्यात शुक्रवारी दोन रुग्ण होते, आज एकाही रुग्णाची नोंद नाही. रुग्णांची संख्या ९० वर गेली आहे. अकोला येथे शुक्रवारी चार तर आज आठ असे एकूण १२ रुग्ण आढळून आले. येथील रुग्णांची संख्या ४० झाली आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई