मुंबई/औरंगाबाद : राज्यभरात गेल्या २४ तासांत ८७ पोलिसांना आणि औरंगाबादमधील राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) ७३ जवानांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.
राज्यभरात १ लाख २० हजार पोलीस कर्मचारी, तर सुमारे २० हजार अधिकारी आहेत. अन्य कर्मचारी मिळून राज्य पोलीस दलात पावणेदोन लाखांच्या जवळपास पोलीस तैनात आहेत. शुक्रवारी पहाटेपर्यंत २४ तासांत ८७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. यात ७१ अधिकारी असून मुंबईतील पोलिसांचे प्रमाण सर्वाधिक आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित पोलिसांच्या संपर्कात आलेल्या पोलिसांना सुरुवातीला क्वारंटाइन करण्यात येत होते. मात्र सध्या मनुष्यबळाअभावी या पोलिसांना कामावर बोलावले जात आहे. तर काही ठिकाणी वाढत्या संख्येमुळे क्वारंटाइन करणेही बंद केले आहे. लक्षण दिसल्यानंतर या पोलिसांची तपासणी करण्यात येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.राज्यात दिवसभरात १०८९ रुग्ण, तर ३७ मृत्यूमुंबई : शुक्रवारी दिवसभरात १०८९ रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १९ हजार ६३ वर पोहोचली आहे, तर दिवसभरातील ३७ बळींनी एकूण कोरोना मृतांचा आकडा ७३१ वर पोहोचला. राज्यात आतापर्यंत एकूण ३४७० जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज राज्यातील ३७ बळींपैकी २५ मृत्यू मुंबई परिसरात तर दहा पुण्यातील आहेत. जळगाव आणि अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी एक एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.११० पैकी ७३ पॉझिटिव्हऔरंगाबादमधील एसआरपीएफच्या जवानांची डी कंपनी मालेगावमधील दीड महिन्याचा बंदोबस्त आटोपून ५ मे रोजी परतली. त्यांना औरंगाबाद महापालिकेने श्रेयस कॉलेजमध्ये क्वारंटाइन केले आहे. बुधवारी त्यांचे स्वॅब घेतले. त्याचा अहवाल शुक्रवारी आला. ११० जवानांपैकी ७३ जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.