coronavirus: चिंता घटली! कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान आज राज्याला मिळाला मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 10:44 PM2021-03-08T22:44:12+5:302021-03-08T22:44:40+5:30
coronavirus in Maharashtra : राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे शासन आणि प्रशासनासमोरील चिंता वाढत असताना आज सरकार आणि जनतेसाठी मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.
मुंबई - कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे. (coronavirus in Maharashtra ) वाढत्या रुग्णसंख्येमुळे शासन आणि प्रशासनासमोरील चिंता वाढत असताना आज सरकार आणि जनतेसाठी मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. गेल्या काही आठवड्यांनंतर आज राज्यात नव्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. (8744 new patients have been tested as positive in the Maharashtra. Also 9068 patients recovered )
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात आठ हजार ७४४ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर आज नऊ हजार ६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे किंचीत प्रमाणात का होईना आज राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटली आहे. राज्यात दिवसभरात कोरोनामुळे २२ जणांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत राज्यात एकूण २० लाख ७७ हजार ११२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थिती राज्यात ९७ हजार ६३७ अॅक्टिव रुग्ण आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या बरे होण्याचे प्रमाण हे ९३.२१ टक्के एवढे आहे.
राज्यात आज 8744 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 9068 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2077112 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 97637 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.21% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 8, 2021
दरम्यान, राज्यात कोरोनामुळे निर्माण होत असलेल्या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील काही भागात लॉकडाऊन लागण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कठोर पावले उचलू शकतात, असे संकेत राजेश टोपे यांनी दिले आहेत.
एनडीटीव्हीशी बोलताना राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी लॉकडाऊन शब्दाचा वापरसुद्धा खूप सावधपणे केला आणि गरज भासल्यासा काही जिल्ह्यांमध्ये याबाबतची पावले उचलली जातील. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांना लॉकडाऊन लावण्याचे अधिकार दिले जातील. जनतेला नियमांचे पालन करावे लागेल. नियमांचे पालन न केल्यास होणाऱ्या दंडामध्ये वाढ केली पाहिजे.