Coronavirus: मुंबईत ९ हजार ३१० कोरोनाबाधित रुग्ण; मृतांचा आकडा ३६१ पर्यंत पोहचला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 02:58 AM2020-05-05T02:58:46+5:302020-05-05T02:59:05+5:30
शहर उपनगरात नोंद झालेल्या १८ मृत्यूंपैकी १० रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. तर तीन जणांचा मृत्यू वार्धक्याने झाला
मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंत्रणा अहोरात्र झटत असली तरीही रुग्णसंख्येचा आलेख वाढतच आहे. त्यात सोमवारी शहर उपनगरात सोशल डिस्टन्सिंग दूर सारत मद्यविक्रीसाठी गर्दी लोटलेली दिसून आली, अशा प्रकारामुळे संसगार्चा धोका अधिक बळावत आहे. शहर उपनगरात सोमवारी ५१० कोरोना बाधितांचे निदान झाले असून रुग्णसंख्या ९ हजार ३१० इतकी झाली आहे. तर दिवसभरात १८ मृत्यूंची नोंद झाली असून बळींचा आकडा ३६१ झाला आहे.
शहर उपनगरात नोंद झालेल्या १८ मृत्यूंपैकी १० रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. तर तीन जणांचा मृत्यू वार्धक्याने झाला. १८ मृतांपैकी १४ जण पुरुष तर चार महिला होत्या. या मृत्यूंपैकी दोन जणांचे वय ४० वर्षांखालील होते, तर ९ जणांचे वय ६० हून अधिक होते. तर उर्वरित सात रुग्ण ४० ते ६० दरम्यान होते. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये शनिवारपर्यंत २५५ कोविड- १९ क्लिनिकमध्ये ११ हजार ५९१ लाभार्थींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी ३ हजार ७१३ संशयितांचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यातून ८५३ संशयित कोरोना रुग्ण आढळले आहेत.
पालिकेने २७ एप्रिल पासून झोपडपट्टी परिसरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वेक्षण सुरु केले आहे. आतापर्यंत एकूण ३ लाख ४३ हजार ७१७ घरांमध्ये पोहोचून ४२,७५२ ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली आहे. यात ६९१ ज्येष्ठ नागरिकांना सर्वंकष उपचारांसाठी विभागातील पालिका व खासगी उपचार केंद्रांमध्ये पाठविले.
बेस्टच्या ३६ कर्मचाऱ्यांना लागण
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्टच्या ३६ कामगारांना कोरोनाची लागण झाली असून तिघांचा मृत्यू झाला. रुग्णांच्या संपर्कात आलेले सुमारे चारशे कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाइन केले आहे. वडाळा येथील बस आगारात विद्युत पुरवठा विभागातील कर्मचाºयाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांनतर बॅकबे आगारातील कर्मचाºयाचा रविवारी परळ येथील पालिकेच्या के. ई.एम. रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होता.
प्रमुख रुग्णालयांत खाटांची क्षमता वाढविणार
कोरोना (कोविड-१९) बाधित असलेल्या तीव्र आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता वाढविण्यासाठी निर्देशित कोरोना रुग्णालयांमधील खाटांची क्षमता वाढवून येत्या काही दिवसांत ४ हजार ७५० इतकी करण्याचे पालिका प्रशासनाचे नियोजन आहे. यात केईएम, नायर, सेंट जॅर्ज, सेव्हन हिल्स यासारख्या रुग्णालयांचा समावेश आहे.