coronavirus: ९६ वर्षांच्या आजींनी केली कोरोनावर मात, २२ दिवस कोरोनाशी लढा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 04:10 AM2020-09-01T04:10:40+5:302020-09-01T04:11:08+5:30
शाच एक ९६ वर्षांच्या किशोरी (नाव बदललेले) ज्यांना आयएलडी म्हणजे इंटरस्टिशियल फुप्फुसाचा आजार होता व त्या कोरोना पॉझिटिव्ह झाल्या; परंतु २२ दिवस त्यांनी मुलुंड येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कोरोनाशी यशस्वीपणे लढा दिला आहे.
मुंबई : जागतिक पातळीवर कोरोना विषाणूमुळे कहर निर्माण झाला असून अजूनही परिस्थिती नियंत्रणात येत नाही. कोरोना संक्रमणातून ९० वर्षांवरील वृद्ध नागरिक बरे होत आहेत.
अशाच एक ९६ वर्षांच्या किशोरी (नाव बदललेले) ज्यांना आयएलडी म्हणजे इंटरस्टिशियल फुप्फुसाचा आजार होता व त्या कोरोना पॉझिटिव्ह झाल्या; परंतु २२ दिवस त्यांनी मुलुंड येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कोरोनाशी यशस्वीपणे लढा दिला आहे.
याविषयी माहिती देताना संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. हार्दिक ठक्कर सांगतात, फुप्फुसांच्या आजारामुळे त्रस्त असलेल्या ९६ वर्षांच्या आजी अत्यंत गंभीर स्थितीत आल्या होत्या. कोविड-१९, न्यूमोनिया आणि श्वसन बिघाडासह सर्दी, खोकला याची लागण तसेच शरीरातील आॅक्सिजनची मात्रा कमी झाली होती. ९ आॅगस्ट २०२० रोजी या आजी रुग्णालयात दाखल झाल्या.
त्यांना तातडीने अतिदक्षता विभागामध्ये दाखल करून व्हेंटिलेटरवर ठेवले. वैद्यकीय चाचण्यांमधून त्यांच्या फुप्फुसांचे ४५ टक्के नुकसान झाल्याचा अहवाल आला होता.
दहा विशेषज्ञांची टीम दिवसरात्र त्यांच्यावर लक्ष ठेवून होती. या आजींना १९ दिवसांनंतर अतिदक्षता विभागाच्या बाहेर स्थानांतरित केले. सामान्य वॉर्डमध्ये आणखी तीन दिवस ठेवल्यावर त्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली, त्यानंतर २२ व्या दिवशी त्यांना घरी सोडण्यात आले.
आजींनी कोविडला दिलेली मातही नक्कीच इतर रुग्णांना प्रेरणा देणार आहे़
प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे वृद्ध व्यक्तींना कोरोना विषाणूच्या बाबतीत अधिक धोका असतो. त्यातच हृदयरोग, फुप्फुसाचा रोग आणि मधुमेह किंवा मूत्रपिंडाचा रोग असेल व कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या आजाराचा धोका सर्वाधिक वृद्ध व्यक्तींना असल्याचेही सांगितले जात आहे, अशी माहिती डॉ. ठक्कर यांनी दिली.