CoronaVirus: राज्यात ९,९१५ कोरोनाबाधित रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 06:23 AM2020-04-30T06:23:29+5:302020-04-30T06:23:42+5:30
या कोरोनाबाधितांमध्ये ७० टक्के रुग्ण मुंबईत आहेत. त्यानंतर ठाणे, पुणे, नाशिकमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण सर्वाधिक आहे.
मुंबई : राज्यात एप्रिलअखेरीस कोरोना रुग्णांची संख्या १० हजारांजवळ पोहोचली आहे. ही परिस्थिती दिवसागणिक यंत्रणांसाठी आव्हानात्मक होते आहे. या कोरोनाबाधितांमध्ये ७० टक्के रुग्ण मुंबईत आहेत. त्यानंतर ठाणे, पुणे, नाशिकमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण सर्वाधिक आहे.
राज्यात बुधवारी ५९७ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, कोरोनाबाधितांची संख्या आता तब्बल १० हजारांच्या टप्प्यावर आहे. सध्या राज्यात ९ हजार ९१५ कोरोना रुग्ण आहेत. राज्यात बुधवारी ३२ मृत्यूंची नोंद झाली; त्यामुळे मृतांची संख्या ४३२ झाली आहे.
सर्वाधिक रुग्णांचे प्रमाण राजधानी मुंबईतील आहे. मुंबईत बुधवारी ४७५ रुग्णांचे निदान झाले असून, रुग्णसंख्या ६ हजार ६४४ झाली आहे. तर २६ मृत्यूंची नोंद दिवसभरात झाली असून, बळींचा आकडा २७० वर गेला आहे. राज्यात बुधवारी नोंदलेल्या मृत्यूंमध्ये २६ मुंबईतील असून, पुण्यातील तीन, सोलापूर, औरंगाबाद व पनवेल शहरातील प्रत्येकी एक आहे.