मुंबई : ‘पुनश्च हरिओम’च्या चौथ्या टप्प्याअंतर्गत अखेर मुंबईतील सलून, ब्यूटीपार्लरचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र तिथे अपॉइंटमेंट असेल तरच प्रवेश मिळेल. सध्या केवळ केस कापणे, केसांना कलप लावणे अशा सेवा देण्यास परवानगी असेल. तर त्वचेसंदर्भात सेवा देण्यासाठी मनाई आहे. अखेर या संदर्भातील नियमावली पालिकेने जारी केली आहे.
मुंबईतील सलून, ब्यूटीपार्लर सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने २८ मे रोजी दिली. परंतु याबाबत कोणतीही नियमावली नसल्यामुळे सलून चालकांमध्ये संभ्रम होता. अखेर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी बुधवारी यासंदर्भात परिपत्रक काढले. मात्र तत्पूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही सूचना संबंधितांना केल्या आहेत. सलून कर्मचाऱ्यांनी हातमोजे, अॅप्रन, मास्क वापरणे, सॅनिटाईज, प्रत्येक सेवेनंतर खुर्ची निर्जंतुक करणे बंधनकारक आहे. ग्राहकासाठी स्वतंत्र डिस्पोजेबल टॉवेल/नॅपकिन वापरणे आवश्यक आहे. ३१ जुलैपर्यंत या नियमांनुसार काम सुरू राहणार आहे. नियम मोडणाऱ्यांवर साथरोग कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.