Coronavirus: अनधिकृतपणे नाव वापरणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई; महापालिकेने घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 12:06 PM2020-04-07T12:06:33+5:302020-04-07T12:06:47+5:30
देणगी गोळा करण्याच्या अनुषंगाने महापालिकेने कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला कोणत्याही प्रकारचे अधिकार दिलेले नाहीत.
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे बोधचिन्ह व नाव अनधिकृतपणे वापरून देणग्या गोळा करत सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. अशा लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
कोरोना कोविड १९' या आजारास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्या विरोधात लढण्यासाठी पालिकेचे अधिकारी व कर्मचारी दिवस-रात्र कार्यरत आहेत. मात्र, याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन काही समाज विघातक प्रवृत्ती महापालिकेच्या बोधचिन्हाचा व नावाचा अनधिकृतपणे वापर करून देणग्या गोळा करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
देणगी गोळा करण्याच्या अनुषंगाने महापालिकेने कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला कोणत्याही प्रकारचे अधिकार दिलेले नाहीत. तरी याबाबत नागरिकांनी सजग रहावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.