मुंबई – चीनसह संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसचं संकट उभं राहिलं आहे. या व्हायरसचा सामना करण्यासाठी अनेक देश आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. चीनच्या वुहान शहरातून कोरोनाचा फैलाव जगभरात झाला. मात्र सध्या चीनने कोरोनाचा प्रार्दुभाव कमी केला असून गुरुवारी वुहान शहरात एकही कोरोनोचा रुग्ण आढळून आला नाही. हळूहळू वुहान शहराची परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.
कोरोनाचे भारतात २७० रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात सर्वाधिक ६३ रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. देशाची राजधानी मुंबईतील व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेकांना राज्य सरकारने वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला आहे. सरकारी कार्यालयातील उपस्थिती २५ टक्क्यांवर आणली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकट दूर करण्यासाठी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.
रविवारी २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये असं सांगितलं जात आहे. मात्र त्याचसोबत संध्याकाळी ५ वाजता लोकांनी घराच्या बाहेर येत टाळ्या, थाळीनाद आणि घंटानाद करुन आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, सफाई कामगार यांचं कौतुक करावं असंही मोदींनी सांगितले आहे. मात्र मोदींच्या या आवाहनावर अभिनेत्री नगमा हिने टीका केली आहे.
नगमा हिने ट्विट करुन म्हटलंय की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी १२० कोटी रुपये खर्च केले पण कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी फक्त टाळी आणि थाळी, एक ह्दय किती वेळा जिंकणार मोदीजी? असा खोचक सवाल करत मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे कुटुंब भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना अहमदाबादला साबरमती आश्रमात नेण्यात आलं होतं. मात्र ट्रम्प यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. कोट्यवधी रुपये ट्रम्प यांच्या स्वागतासाठी खर्च केले होते. यावरुन विरोधकांनी केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. पण कोरोना व्हायरसचा देशात प्रार्दुभाव वाढत चालला आहे. दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यावरुन केंद्र सरकारला लक्ष्य करण्याची संधी विरोधक सोडत नसल्याचं दिसून येत आहे.