CoronaVirus: तीन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर मुंबई पोलीस आयुक्तांचा संवेदनशील निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 11:12 AM2020-04-28T11:12:33+5:302020-04-28T11:13:10+5:30
आतापर्यंत कोरोनामुळे मुंबई पोलीस दलातल्या तिघांचा मृत्यू
मुंबई: कोरोनामुळे तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि आजार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय आयुक्तांकडून घेण्यात आला आहे. यामुळे असे कर्मचारी सोमवारपासून (काल) लॉकडाऊन संपेपर्यंत भरपगारी रजा घेऊ शकतील.
५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि आजारांचा सामना करत असलेल्या हवालदारांना कामावर न बोलवण्याच्या सूचना आयुक्तांकडून पोलीस ठाण्यांना आणि वाहतूक पोलीस विभागांना देण्यात आल्या आहेत. हवालदारांना स्वत:हून कामावर यायची इच्छा असल्यास त्यांना येऊ द्यावं, असंदेखील आयुक्तांनी म्हटलं आहे. ४८ तासांमध्ये कोरोनामुळे मुंबई पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर आयुक्तांनी पोलीस ठाण्यांना आदेश दिले.
'आम्ही पोलीस ठाण्यांना आणि वाहतूक विभागांना ५५ वर्षांवरील हवालदारांना सुट्टी देण्याच्या सूचना केल्या आहेत. गंभीर शारीरिक आजार असलेल्या कर्मचाऱ्यांनादेखील घरीच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत,' अशी माहिती पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांनी दिली. पोलीस आयुक्तालयातून आमच्याकडे ५० ते ५२, ५२ ते ५५ आणि ५५ ते ५८ वर्षे वयाच्या आणि गंभीर आजार असलेल्या कर्मचाऱ्यांचा तपशील मागवण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.