Join us

coronaVirus : विमानतळावरील हवाई वाहतूक ठप्प; विविध विमान कंपन्यांची ९४ विमाने विमानतळावर पार्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 1:32 AM

coronaVirus : इंडिगोची २६ विमाने, स्पाईसजेटची १४ विमाने, गो एअरची ७ विमाने, एअर इंडिया एक्स्प्रेसची २ विमाने, विस्ताराची ६ विमाने व एअर एशियाचे १ विमान मुंबई विमानतळावर पार्क करण्यात आली आहेत.

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा बंद करण्यात आल्याने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवास ठप्प झाला आहे. विविध विमान कंपन्यांनी आपापली विमाने विमानतळावर पार्क केल्याने विमानतळाला पार्किंगचे स्वरूप आले आहे. मुंबई विमानतळावर सध्या ९४ विमाने पार्क करण्यात आली आहेत.यामध्ये सर्वाधिक ३८ विमाने एअर इंडियाची आहेत. इंडिगोची २६ विमाने, स्पाईसजेटची १४ विमाने, गो एअरची ७ विमाने, एअर इंडिया एक्स्प्रेसची २ विमाने, विस्ताराची ६ विमाने व एअर एशियाचे १ विमान मुंबई विमानतळावर पार्क करण्यात आली आहेत. विमानतळावरील विमानांची देखभाल व दुरुस्तीचे काम सध्या करण्यात येत आहे. देशांतर्गत विमान सेवा बंद करण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करण्यात आली होती. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे विमान प्रवास रद्द होण्याचे प्रमाण वाढलेले असल्याने अनेक विमान कंपन्यांची विविध उड्डाणे पूर्वीच रद्द करण्यात आली होती.भारतात खासगी किंवा व्यावसायिक वापरासाठी विमान आयात करण्यापूर्वी विमानाला नाईट पार्किंगची सुविधा उपलब्ध असणे अनिवार्य आहे. विमान पार्क केल्यानंतर नियमितपणे त्याची देखभाल करणे अत्यावश्यक असते. त्यामुळे ज्या विमानतळावर विमान पार्क करण्यात येत असेल त्याच्या जवळपास त्यासाठी आवश्यक तांत्रिक कर्मचारी उपलब्ध होईल याची काळजी घेतली जाते. भारतात सध्या सुमारे साडेसहाशे विमाने कार्यरत आहेत. साधारणत: एका वेळी काही ठरावीक विमाने देखभाल व दुरुस्तीसाठी पार्क केली जातात, तर इतर विमाने त्यावेळी उड्डाण करत असतात. एकाच वेळी सर्व विमाने पार्क करण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनालादेखील त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागले आहेत. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावरील बंदी कधी उठेल याबाबत आता काहीही सांगणे कठीण आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार लवकर थांबावा व विमान वाहतुकीवरील निर्बंध उठून पूर्वीप्रमाणे विमानांची आकाशात गर्दी व्हावी अशी इच्छा कर्मचारी व हवाई वाहतुकीशी सबंधित व्यक्ती करत आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसविमानतळ