Join us

coronavirus: गावाला जाण्यास परवानगी द्या! मुंबईच्या डबेवाल्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 2:51 AM

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रथम लॉकडाउन घेण्यात आल्यानंतर परिस्थिती निवळून मुंबईकरांचे जीवन सुरळीत होऊन मुंबई पुन्हा घड्याळाच्या काट्यावर धावू लागेल, अशी आशा मुंबई डबेवाल्यांना होती. मात्र दिवसेंदिवस मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच चालल्याने डबेवाला बांधवही हताश झाले आहेत.

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून १७ मेपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. यामुळे मुंबईची भूक भागवणारे मुंबईचे डबेवाले मुंबईतच अडकून पडले आहेत. आम्हाला आमच्या गावी जाण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी आता मुंबई जेवण डबेवाहतूक मंडळाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. लॉकडाउन लागू करण्यात आल्यामुळे मुंबईचा अन्नदाता मुंबईतच अडकून पडला आहे. ना हाताला काम ना पगार अशा विवंचनेत सापडल्यामुळे त्याला आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच पुन्हा लॉकडाउन वाढण्याची शक्यताआहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रथम लॉकडाउन घेण्यात आल्यानंतर परिस्थिती निवळून मुंबईकरांचे जीवन सुरळीत होऊन मुंबई पुन्हा घड्याळाच्या काट्यावर धावू लागेल, अशी आशा मुंबई डबेवाल्यांना होती. मात्र दिवसेंदिवस मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच चालल्याने डबेवाला बांधवही हताश झाले आहेत. मार्च, एप्रिल या दोन्ही महिन्यांचे वेतन अद्यापही मिळाले नाही. तसेच आता पुन्हा लॉकडाउन वाढण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.लॉकडाउन वाढल्याने मे महिन्याचाही पगार मिळेल की नाही याची भीती डबेवाला बांधवांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबईत अडकलेला शेकडो डबेवाला बांधवांना आपल्या मूळ गावी पुणे, अहमदनगर जिल्ह्यात जाण्यासाठी सरकारने विशेष एसटी बसेसची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर्स अ‍ॅण्ड चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.बहुतांश डबेवाले हे झोपडपट्टीत अती दाटीवाटीच्या जागेत घरे भाड्याने घेऊन राहतात. शिवाय त्यांना सार्वजनिक शौचालयांचा वापर करावा लागत आहे. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. शासन जर परप्रांतीय कामगारांना त्यांच्या घरी परत जाण्यास परवानगी देत आहे. तर डबेवाले कामगारालाही त्याच्या घरी जाण्यास परवानगी दिली गेली पाहिजे. यासाठी एसटी बसेसची खास सोय करण्यात यावी.उपनगरातील वर्सोवा, सातबंगला, जोगेश्वरी, आनंदनगर, दहिसर, बोरीवली, विरार येथून एसटी बसेसची सोय करण्यात यावी, असे मुंबई जेवण डबेवाहतूक मंडळाचे प्रवक्ता विनोद शेटे यांनी सांगितले.परप्रांतीय कामगारांना विशेष ट्रेनने त्यांच्या राज्यांत सोडले जाते आहे. तर विदेशात अडकलेल्या भारतीयांना विशेष विमानाने भारतात आणले जात आहे. मग मुंबईत अडकलेल्या डबेवाले कामगार यांना एसटीने त्यांच्या घरी जाण्यास परवानगी मिळायला हवी. राज्य शासनाकडून अशी परवानगी लवकर मिळावी, असे अध्यक्ष उल्हास मुके यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई