Coronavirus:...आणि आजींना हक्काचे धान्य मिळाले; दहिसर शिधावाटप दुकानातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 01:57 AM2020-05-05T01:57:10+5:302020-05-05T06:54:00+5:30
उपनियंत्रकाच्या तक्रारीनंतर परवानाच रद्द
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका आजीला धान्य नाकारणे दहिसरमधील शिधावाटप दुकानदाराला भारी पडले. त्या महिलेने तातडीने उपनियंत्रकाला याबाबत तक्रार केली. मात्र त्यांच्या आदेशाला फाट्यावर मारत दुकानदाराने कमी धान्य दिल्यानंतर तातडीने त्याचे प्राधिकारपत्र रद्द करण्यात आले आणि आजींना त्यांच्या हक्काचे धान्य मिळाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाउनमध्ये ए चुडासमा (७०) या आजी चुनाभट्टी परिसरात अडकून पडल्या होत्या. त्यांचे शिधावाटप दुकान ४७-ग-८७ हे दहिसरमध्ये मोडत असल्याने धान्य घेण्यासाठी त्या दुकानात गेल्या. मात्र त्यांना धान्य देण्यास दुकानदाराने नकार दिला. तेव्हा याची तक्रार त्यांनी कांदिवलीतील ग विभागाचे शिधावाटप उपनियंत्रक सुहास शेवाळे यांना केली. शेवाळे यांनी आजींना धान्य देण्याचे निर्देश दुकानदाराला दिले. मात्र त्याला केराची टोपली दाखवत दुकानदाराने कमीच धान्य आजींना दिले. आजींनी ही बाब शेवाळे यांच्या कानावर घालताच ते थेट दुकानात जाऊन धडकले. आजींना त्या ठिकाणी बोलावत त्यांची तक्रार ऐकून घेतली आणि त्यानंतर शिधावाटप दुकानदाराचे प्राधिकारपत्र निलंबित केले. तसेच चुडासमा आजींना त्यांच्या हक्काचे पूर्ण धान्य देण्यात आल्याने त्यांनीही शेवाळे यांचे आभार मानले.
मालाड, गोरेगाव व बोरीवलीतही कारवाई!
मालाड पूर्वच्या पिंपरीपाडा परिसरात शिधावाटप दुकान क्रमांक ४२-ग-१६० याची तपासणी घेत त्यामध्ये आढळून आलेल्या दोषांच्या अनुषंगाने दुकानदाराविरूद्ध कुरार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. दुकानदार एकाच प्रकारचे धान्य म्हणजे फक्त गहू किंवा फक्त तांदूळ देतो, अशी तक्रार प्राप्त झाल्यावर गोरेगाव येथील शिधावाटप दुकानाची तपासणी करण्यात आली. त्या ठिकाणीही आढळून आलेल्या दोषांच्या अनुषंगाने गोरेगावमधील शिधावाटप दुकान क्रमांक २७-ग-१४० या दुकानदाराविरुद्ध बांगुरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बोरीवलीत दुकानदाराने कमी धान्य दिल्याची तक्रार शेवाळे यांना प्राप्त झाल्यावर त्यांनी स्वत: बोरीवली येथील शिधावाटप दुकानास भेट दिली. शिधावाटप दुकान क्रमांक ४३-ग-२ या दुकानदाराविरुद्ध त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करत प्राधिकारपत्र निलंबित केले आहे.