coronavirus: ...आणि रांगोळी, पुष्पवृष्टीने घरी झाले स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 02:29 AM2020-05-12T02:29:25+5:302020-05-12T02:29:46+5:30
पालघर जिल्हा रेड झोन घोषित झाला आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयात रुग्ण उपचार घेत असताना, त्यांच्या सुरक्षेसाठी वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका आपले मोलाचे योगदान देत आहेत.
अनिरुद्ध पाटील
बोर्डी (पालघर) - डहाणू तालुक्यातील चिंचणी येथील परिचारिका अर्चना पाटील या बोईसर येथील टिमा रुग्णालयात कोरोना रुग्णांची शुश्रूषा करण्यासाठी घरापासून ३७ दिवस दूर राहिल्या. त्या घरी परतणार असल्याची माहिती जेव्हा त्यांच्या वस्तीतील शेजाऱ्यांना कळली, तेव्हा त्यांनी त्यांच्या घराबाहेर रांगोळी काढण्यासह पुष्पवृष्टीने त्यांचे स्वागत केले, टाळ्या वाजवल्या. पाटील यांच्या मामीने त्यांना पुष्पहार घातला. समाजाप्रती केलेल्या सेवेची घेतली गेलेली ही दखल मनाला समाधान देणारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पालघर जिल्हा रेड झोन घोषित झाला आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयात रुग्ण उपचार घेत असताना, त्यांच्या सुरक्षेसाठी वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका आपले मोलाचे योगदान देत आहेत. नोकरी आणि कुटुंबीय या दोन आघाड्यांवर लढताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. रुग्णालयातून घरी आल्यावर त्यांना अधिक काळजी घेऊन घरात प्रवेश करावा लागतो. तसेच घरात वावरताना देखील एका वेगळ्याच दडपणाचा सामना करावा लागतो. रुग्णालयातील कोरोना रुग्णांच्या विलगीकरण कक्षात सेवा देताना, या परिचरिकांना घरापासून अनेक दिवस दूर रहावे लागते. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी सांभाळता येत नसल्याने खंत वाटत असल्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली जाते.
समाज देतो आदर
कोरोना रुग्णांची सेवा करणाºया या परिचारिकांना आज समाजात मान तसेच
आदराची वागणूक मिळत आहे. ही समाधानकारक बाब असून हे चित्र सकारात्मकतेचे दर्शन घडविणारे आहे.
कोरोना रुग्णांची सेवा बजावून घरी परतल्यावर परिसरातील लोकांनी जे स्वागत केले, ते केवळ माझेच नाही, तर प्रत्येक आरोग्य कर्मचाºयाचे आहे. कोरोनाविरोधातील या लढाईत आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची तसेच जोखमीची आहे. त्यामुळेच समाजाकडून मिळणाºया या वागणुकीमुळे काम करण्यास हुरूप येतो.
-अर्चना पाटील, परिचारिका
कोरोनापूर्वीची आणि आताची सेवा बजावण्याची परिस्थिती यात खूपच फरक पडला आहे. आरोग्याशी लढताना अनेक आरोग्य कर्मचाºयांकडे सेफ्टी कीट नाहीत. घरी वावरतानाही विशेष काळजी घ्यावी लागते. कुटुंबीयांवर त्याचा परिणाम दिसतो. असे असले तरीही आम्ही सर्वोत्तम सेवा देतो.
- अंजली जनाथे,
परिचारिका, डहाणू