मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्याला अटकाव घालण्यासाठी कोरोना रुग्णांची नावे जाहीर करण्याचे निर्देश राज्य सरकार व संबंधित प्रशासनाला द्यावेत, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. नवी मुंबईची वैष्णवी घोळवे आणि सोलापूरचे महेश गाडेकर यांनी अॅड. विनोद सांगवीकर यांच्यातर्फे ही जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.याचिकेनुसार, कोरोनाचा संसर्ग वाढला असून आता आपण या संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात कधीही पोहोचू शकतो. या टप्प्यात कोणामुळे संसर्ग झाला आहे, याची माहिती मिळणे कठीण होते. जे लोक घराबाहेर पडले नाहीत, त्यांनाही या संसर्गाची लागण होते. हे टाळण्यासाठी कोरोना रुग्णांची नावे व फोटो प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.उदाहरणादाखल याचिककर्त्याने सोलापूरच्या एका मटण विक्रेत्याची माहिती दिली आहे. सोलापूरच्या मुरारजी पेठेतील एका मटण विक्रेत्याला कोरोना झाला आणि त्याच्या संपर्कात १००० लोक आले. त्या मटण विक्रेत्याला त्याच्या संपर्कात आलेल्या गिºहाईकांची माहिती देणे शक्य नाही. त्याला प्रत्येकाचे नाव आणि घरचा पत्ता कसा माहीत असेल? या परिस्थितीत जर मटण विक्रेत्याचे नाव आणि फोटो प्रसिद्ध केला असता तर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची डॉक्टरांनी तपासणी केली असती. या पेठेत अनेक मटण विक्रेते असल्याने लोकांच्याही मनात संभ्रम आणि भीती निर्माण झाली, असे याचिकेत म्हटले आहे.रुग्णांचे नाव प्रसिद्ध केल्यास ‘मानवता’ धोक्यात येईल. संबंधित रुग्णांना वाळीत टाकण्यात येईल, अशी भीती सरकारला आहे. एखाद्या आजाराचा प्रसार इतक्या वेगाने होत असेल तर जनहितासाठी रुग्णांची नावे प्रसिद्ध करणे आवश्यक आहे, असेही याचिकेत म्हटले आहे.
coronavirus: कोरोना रुग्णांची नावे जाहीर करा , उच्च न्यायालयात जनहित याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 2:32 AM