Join us

coronavirus: मुंबईत कोरोनाचे आणखी २० बळी, धारावीत नव्याने आढळले ५७ रुग्ण  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 7:16 AM

१४ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील ११ रुग्ण पुरुष व ९ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी दोघांचे वय ४० वर्षांखाली होते.

मुंबई : मुंबईत कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्या रुग्णांचा आकडा वाढतच आहे. मुंबईत सोमवारी कोरोनामुळे २० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी १४ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील ११ रुग्ण पुरुष व ९ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी दोघांचे वय ४० वर्षांखाली होते. दहा जणांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित ८ रुग्ण ४० ते ६० वर्षादरम्यानचे होते.दादर येथे सोमवारी कोरोनाची नव्याने ५ प्रकरणे आढळली. दादर येथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ११४ झाली आहे. माहीम येथे नव्याने १८ रुग्ण आढळले. एकूण रुग्णांची संख्या १३७ झाली आहे. धारावी येथे नव्याने ५७ रुग्ण आढळले. एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९१६ झाली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी यापूर्वीच धारावी परिसराला भेट देत कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती जाणून घेतली आहे. स्वसंरक्षण वेश परिधान करुन कोणतीही अडचण असल्यास प्रशासनाशी संपर्क करा, असे म्हणत मनोबल वाढवले आहे. धारावीसारख्या विभागात इमारती आणि झोपडपट्टी/दाट वस्ती यात आढळणाऱ्या रुग्ण संख्येचे वर्गीकरण करावे. संस्थात्मक अलगीकरण सुविधेमध्ये जास्तीत-जास्त लोकांना नेण्यात यावे, असे निर्देश चहल यांनी विभागातील अधिकाऱ्यांना दिले. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई