बाधितांचा आकडा १५८ वर : भायखळा कारागृहातील महिला कैद्याला लागण मुंबई : आर्थर रोड कारागृहातील ७७ कैद्यांच्या उपचारासाठी जागेबाबत तडजोड सुरु असताना, कारागृहातील आणखीन ८१ कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोनाबाधित कैद्यांचा आकडा १५८ वर पोहचल्याने चिंतेत भर पडली आहे. तर, भायखळा कारागृहातील ५४ वर्षीय महिला कैदीला कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले.आर्थर रोड कारागृहातील जे. जे. रुग्णालयात दाखल झालेल्या कैद्यांच्या तपासणीत कारागृहात कोरोनाने संक्रमण केल्याचे उघड झाले. पहिल्या दिडशे जणांच्या चाचणी ७७ कैदी आणि २६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच त्यांना जे. जे. आणि सेंट जॉर्ज रुग्णालयातील विशेष कक्षात ठेवण्यात येणार होते. मात्र तेथील अपुºया व्यवस्थेमुळे माहुल येथील तयार असलेल्या म्हाडा इमारतीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र स्थानिकांनी विरोध केल्याने रविवारपर्यंत हे कैदीकारागृहातील विलगीकरण कक्षात उपचार घेत आहेत. तर दुसरीकडे कैद्यांना ठेवले जाईल ती जागा उपकारागृह असेल. त्यामुळे त्याच्या भोवतालचा शंभर मीटरचा परिसर मोकळा असणे बंधनकारक आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करता माहुल येथील पर्याय रद्द करत कैद्यांसाठी आर्थर रोड कारागृहातील सर्कल क्रमांक ३ आणि १० मध्ये विलगिकरण कक्ष तयार करण्यात आले आहे. तेथेच या कैद्यांना ठेवले आहे. रविवारी कारागृहाचे महानिरीक्षक दीपक पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहातील आणखीन ८१ कैद्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सद्यस्थितीत कारागृहात एकूण २८०० कैदी आहेत. अन्य कैद्यांचीही चाचणी सुरु आहे. त्यामुळे या कैद्यांनाही येथेच ठेवण्यात येणार असल्याचे समजते. जे. जे. रुग्णालयातील ७ डॉक्टरांचे पथक कारागृहातील क्वॉरंटाइन कक्षात लक्ष ठेवणार आहेत. रविवारी त्यांनी कक्षाला भेट दिली.तर, तर आर्थर रोड कारागृहातील दोन पोलिसांना भायखळा कारागृहातील विश्रामगृहात ठेवण्यात आले होते. त्या दोघांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर येताच भायखळा कारागृहातील ३० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात, एक डॉक्टरला बाधा झाल्याचे समोर आले. तर अन्य कर्मचाºयांचा अहवाल निगेटीव्ह आला होता. संबंधीत डॉक्टर कारागृहाबाहेर पडल्यानंतर त्याला बाधा झाल्याचे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यातच ५ मे रोजी भायखळा कारागृहातील ५४ वर्षीय महिला कैदीला श्वास घेण्यास अडथळा झाल्याने जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. ताप वाढल्याने ३ दिवसांनी ८ मे रोजी सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. त्यात कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. ९ मे रोजी तिची पुन्हा चाचणी करण्यात आली आहे. त्यात तिला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. कैदी बाहेर असताना हा संसर्ग झाल्याचा कारागृहातील अधिकाºयांचा अंदाज आहे. प्रतिबंधात्मक म्हणून कारागृहातील अन्य कैदयांचीही तपासणी करण्यात येत असल्याचे समजते.
coronavirus: आर्थर रोड कारागृहातील आणखी ८१ कैद्यांना कोरोनाची बाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 6:55 AM