मुंबई : मुंबईत बुधवारी घाटकोपर (एन) विभागातील ६८ वर्षीय महिलेला कोरोना झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. ही महिला मंगळवारी निदान झालेल्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आली होती. तिने कुठेही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नसल्याचे आरोग्य विभागाच्या पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले.मुंबईत सेव्हन हिल रुग्णालयात, तसेच निराज हॉटेल येथे बुधवारी प्रत्येकी १० आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे विलगीकरण करण्यात आले. थुंकणाऱ्यांना आळा बसावा यासाठी मुंबई महापालिकेने दंडाच्या रकमेत पाचपट वाढ करून तो दंड आता एक हजार रूपये केला केला आहे.खाजगी प्रयोगशाळेतही होणार चाचणीसध्या कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत संशयित रुग्णांची चाचणी केली जात आहे. तसेच परळ येथील केईएम रुग्णालयातही चाचणीची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. मात्र संशयित रुग्णांच्या तुलनेत प्रयोगशाळेची क्षमता कमी असल्याने पालिकेने आता खाजगी प्रयोगशाळांनाही चाचणीची परवानगी देण्याचा विचार सुरू आहे. केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची माहिती या प्रयोगशाळांना देण्यात येणार आहे.रिकाम्या इमारती घेणार ताब्यातसंशयित रुग्णांवर देखरेख ठेवणे शक्य व्हावे यासाठी त्यांना विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक आहे. यासाठी पालिकेची बिल्डर्स असोसिएशनसोबत चर्चा सुरू आहे. त्यानुसार मुंबईत विक्रीसाठी रिकाम्या असलेल्या इमारती ताब्यात घेऊन तिथे कोरोनाच्या संशयित रुग्णांची व्यवस्था करण्याचा विचार सुरू आहे. आतापर्यंत पालिकेने पाचशे लोकांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. यापुढे संख्या वाढली, तर त्यासाठी ही व्यवस्था केली जाणार आहे.
Coronavirus : मुंबईत कोरोनाचा आणखी एक नवा रुग्ण दाखल, १० प्रवाशांचे केले विलगीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 6:49 AM