मुंबई - कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी लसीकरणाबरोबरच आणखी अनोख्या प्रयोग महापालिकेने सुरू केले आहेत. कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाच्या उपचार पद्धतीचा प्राथमिक प्रयोग अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयातील दोनशेपेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी ठरला आहे. (CoronaVirus Positive News) हे मिश्रित औषध दिल्यानंतर फक्त एकाच (०.५ टक्के) रुग्णास ऑक्सिजनची गरज भासली. तर मृत्यू दरामध्ये तब्बल ७० टक्के घट झाली आहे. रुग्णालयातील उपचारांचा कालावधीही १३ ते १४ दिवसांवरुन आता पाच - सहा दिवसांवर आला आहे. (Antibody cocktail experiment successful in Mumbai, large reduction in mortality, shortening of treatment duration)
बाधित रुग्णांवर यशस्वी उपचारासाठी निरनिराळ्या औषधोपचारांची चाचपणी पालिका करीत आहे. याचाच एक भाग म्हणून कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रण सेव्हन हिल्स रुग्णालयातील आतापर्यंत २१२ कोविड बाधितांना सलाईनद्वारे देण्यात आले. यापैकी १९९ रुग्णांचे उपचारअंती निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. त्याचा सविस्तर अभ्यास प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
अमेरिकेमध्ये नोव्हेंबर २०२० पासून या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाचा उपयोग करण्यात येत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोविड बाधित झाल्यानंतर त्यांना हेच मिश्रित औषधोपचार देण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये अत्यंत वेगाने सुधारणा झाली. देशात १० मे २०२१ रोजी केंद्रीय औषधी प्रमाणके नियंत्रण संघटनेकडे या औषधांची नोंदणी होऊन औषधी महानियंत्रक यांनी त्यास मान्यता दिली आहे.
या मिश्रणाचा यांना फायदा १२ वर्षांपेक्षा अधिक वय आणि ४० किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या बाधित रुग्णांना हे औषध दिले जाते. प्रकृती अधिक बिघडण्याचा धोका असलेल्या गटातील बाधित रुग्णांना हे मिश्रित औषधोपचार दिले जातात. मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकार, दमा आणि त्यासारखे श्वसनाचे इतर तीव्र आजार, उच्च रक्तदाब, सिकलसेल, मेंदूविषयक व्याधी असूनही उपचार करणे शक्य होते.
असे काम करते मिश्रण हे मिश्रित औषध सलाईनद्वारे देण्यासाठी एक तासाचा अवधी पुरेसा ठरतो. त्या कालावधीत संबंधित रुग्णाचे थेट निरीक्षण करता येते. रुग्णालयात दाखल करुन न घेता, ओपीडीमध्ये हे औषध देणे शक्य आहे. रेमडेसिविरसारखी औषधं आणि स्टेरॉईडचा उपयोग टाळून हे मिश्रित औषध देणे शक्य असल्याने रुग्णांना खऱया अर्थाने दिलासा मिळतो. हे औषधोपचार आर्थिकदृष्ट्या रुग्णांना फायदेशीर ठरणारे आहेत. तर डॉक्टरांवरील कामकाजाचा ताणही निवळण्यास मदत होणार आहे.