coronavirus: मिशन झीरोमध्ये अँटिजन चाचणीला प्राधान्य, दोन दिवसांत ४० कोरोनाबाधित रुग्णांचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 03:38 AM2020-07-07T03:38:31+5:302020-07-07T03:38:57+5:30
या वीकेंडला एक हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ४० कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत.
मुंबई : पश्चिम उपनगरात अंधेरी ते दहिसर आणि भांडुप, मुलुंड या विभागांमध्ये मिशन झीरो सुरू आहे. या मोहिमेत आरोग्य पथक कोरोना चाचणी करण्यासाठी प्राधान्याने अँटिजन चाचणीचा वापर करीत आहे. यामुळे बाधित रुग्णांचा तत्काळ शोध लागून कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश येत आहे. या वीकेंडला एक हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ४० कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत.
आतापर्यंत संशयित रुग्णाची चाचणी ‘आरटीपीसीआर’द्वारे केली जात आहे. या चाचणीद्वारे मिळणारा अहवाल अचूक असला तरी निदान होण्यास २४ तासांहून अधिक कालावधी लागत होता. त्यामुळे एका दिवसात केवळ चार ते साडेचार हजार चाचण्या होत होत्या. या विलंबामुळे बाधित रुग्ण अन्य लोकांच्या संपर्कात येणे, अत्यावश्यक शस्त्रक्रियेला विलंब होणे अशी गैरसोय निर्माण होत होती. हा विलंब टाळण्यासाठी अँटिजन चाचणी सुरू करण्याचा निर्णय पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घेतला आहे. अँटिजन चाचणीचा अहवाल अवघ्या अर्ध्या तासात प्राप्त होत असल्याने चाचण्यांचा वेगही वाढला आहे. ही चाचणी प्राधान्याने दहिसर, बोरीवली, मालाड, विलेपार्ले, जोगेश्वरी, अंधेरी या विभागांमध्ये करण्यात येत आहे.
अँटिजन चाचणीचा वापर
पालिका रुग्णालये, बाधित क्षेत्रातील आरोग्य शिबिर, हायरिस्क गटातील लोकं आणि क्वारंटाइनमधील संशयितांची चाचणी करण्यासाठी अँटिजन चाचणी करण्यात येत आहे. संशयितांचा स्वॅब घेऊन चाचणी केली जात आहे. यामध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची विभागणी मध्यम, गंभीर, अतिगंभीर अशी करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जात आहेत.
...अन्यथा पुन्हा चाचणी
अँटिजन चाचणीमुळे अहवाल तत्काळ मिळत असला, तरी एखाद्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यास त्याची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करावी लागते. मात्र पॉझिटिव्ह रुग्णांवर तातडीने आयसोलेशन सेंटरमध्ये उपचार केले जातात. तसेच अँटिजन टेस्ट हायरिस्क कॉन्टॅक्टमधील लक्षणे नसलेले, मधुमेह, मूत्रपिंड विकार, मधुमेह, गरोदर माता यांची टेस्ट करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.