Join us

Coronavirus:...तर पावसाळ्यात रहिवाशांचा जीव टांगणीला; धोकादायक इमारतींवरील चिंंतेचे सावट गडद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 08:02 IST

पालिकांची पथके साधारणत: मार्च एप्रिल महिन्यांत ही यादी प्रसिद्ध करतात आणि कलम २६४ किंवा २६८ अन्वये नोटीसा पाठवल्या जातात.

संदीप शिंदे मुंबई : कोरोनाचा मुकाबला करण्यात पालिकांची यंत्रणा व्यस्त असल्याने सालाबादप्रमाणे शहरांतील धोकादायाक इमारतींची यादी प्रसिद्ध करून दुरूस्तीच्या नोटीसा त्यांना बजावता आलेल्या नाहीत. त्यामुळे अतिधोकादायक श्रेणीतील इमारतीतील रहिवाशांच्या स्थलांतरासह उर्वरित इमारतींची दुरूस्ती यंदा सुरूच होऊ शकली नाही. पावसाळ्यात या इमारतींच्या पडझडीचा धोका वाढण्याची भीती असल्याने अनेक रहिवाशांना जीव मुठीत धरून जगावे लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार दरवर्षी पालिका हद्दीतील मोडकळीस आलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करून पालिका त्यांची यादी प्रसिद्ध करते. ज्या इमारतींची दुरूस्ती अशक्य आहे (सी- १ श्रेणी) तेथील रहिवाशांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून इमारत पाडली जाते. सी - २ ए श्रेणीतल्या रहिवाशांना इमारतीबाहेर काढून इमारतींची दुरूस्ती केली जाते. त्यानंतर त्यांना पुन्हा वास्तव्याची मुभा दिली जाते. तर, सी आणि सी - ३ श्रेणीतल्या इमारतींमध्ये रहिवाशांचे वास्तव्य असताना दुरूस्ती कामे केली जातात. परंतु, मुंबई महानगर क्षेत्रातल्या कोणत्याही महापालिकांनी यंदा कोराना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर यादी अद्याप प्रसिद्ध केलेली नाही.

पालिकांची पथके साधारणत: मार्च एप्रिल महिन्यांत ही यादी प्रसिद्ध करतात आणि कलम २६४ किंवा २६८ अन्वये नोटीसा पाठवल्या जातात. त्यानंतर संबंधित सोसायट्यांपैकी बहुसंख्य ठिकाणी कंत्राटदारांची नियुक्ती करून दुरूस्तीची कामे केली जातात. परंतु, यंदा कोरोना संकटामुळे या इमारतींची दुरूस्ती प्रक्रियाच सुरू झालेली नाही. दरवर्षी पावसापूर्वी अनेक सोसायट्यांकडून स्ट्रक्चरल आॅडिटकरून घेतले जाते. त्यांनी इमारतीचे आयुष्य वाढविण्यासाठी सुचविलेली कामे एप्रिल आणि मे महिन्यांतच केली जातात.

मात्र, त्यासाठी यंदा पालिकेकडून आवश्यक असलेल्या परवानग्या अनेकांना मिळवता आलेल्या नाहीत. काही जणांनी निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदारांची नियुक्तीही केली होती.मात्र, कोरोनामुळे आलेले निर्बंध साहित्य पुरवठ्यातील अडचणी आणि मजुरांचा अभाव यामुळे कुठेही दुरूस्तीची कामे सुरू करता आली नसल्याची माहिती वास्तूविशारद संदीप प्रभू यांनी दिली.गळती वाढणारइमारतींमध्ये होणारी गळती थांबविण्यासाठी अनेक ठिकाणी शेड उभारली जाते. उन्हाळ्यात छतांवर डांबर लावले जाते. मात्र, ती कामेही यंदा झाली नसल्याने अनेक ठिकाणी गळतीची समस्या उग्र रूप धारण करण्याची चिन्हे आहेत. वास्तविक सरकारने इमारतींच्यातातडीच्या दुरूस्ती कामांना परवानगी दिली आहे. मात्र, हे काम करताना येणाऱ्या अडचणींचा विचार करता कुणीही ते सुरू करण्याची हिंमत दाखवली नसल्याचे वास्तुविशारद संदीप प्रभू यांनी सांगितले.यंदाच्या पावसात धोका जास्तयंदा अनेक इमारतींना आतापर्यंत दुरुस्ती करता आलेली नाही. इमारतीची स्ट्रक्टरल स्टेबिलिटी तपासणीची कामेही लांबणीवर पडली आहेत. कोरोना संकटामुळे ओढावलेली ही परिस्थिती धोकादायक इमारतींबाबतची चिंता वाढवणारी आहे. अतिधोकादायक श्रेणीतल्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करणे अत्यावश्यक आहे. - संजीवकुमार धामसे, स्ट्रक्चरल इंजिनीअर

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिका