मुंबई : कोविडचा नवीन प्रकार असलेल्या ओमायक्रॉन प्रभावित देशातून आलेल्या मुंबईतील ८८ प्रवाशांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. यापैकी चार कोविड बाधित असल्याचे आढळून आले आहे. यातील एकाला ओमायक्रॉनची लागण नसल्याचे स्पष्ट झाले आहे, तर अन्य तीन प्रवाशांच्या जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल गुरुवारपर्यंत अपेक्षित असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
परदेशातून १५ दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर एक हजार प्रवासी उतरले. यापैकी आतापर्यंत महापालिकेला ४६६ प्रवाशांची यादी विमानतळ प्राधिकरणाकडून मिळाली आहे. यामध्ये शंभर प्रवासी मुंबईतील रहिवासी असल्याचे आढळून आले. या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीत एक प्रवासी कोविड बाधित असल्याचे मंगळवारी आढळून आले होते.
त्यानंतर आता आणखी तीन प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच शंभरपैकी १२ प्रवासी गुजरात व अन्य राज्यातील असल्याचे आढळून आले. त्यामुळे ८८ प्रवाशांची चाचणी तातडीने करण्यात आली, तर अन्य राज्यांतील प्रवाशांची यादी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आली असल्याचे काकाणी यांनी सांगितले.
ठाण्यात आले २८ प्रवासी
ठाणे जिल्ह्यात दक्षिण आफ्रिकेतून २७ प्रवासी आले आहेत. यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात सात, नवी मुंबई पालिका क्षेत्रात ११, कल्याण - डोंबिवली क्षेत्रात एक, तर मीरा - भाईंदर पालिका क्षेत्रात आठ प्रवासी आल्याची नोंद करण्यात आली आहे.