coronavirus: हॉटेलमालकांची मनमानी; पंचतारांकित हॉटेलमध्ये क्वारंटाइनसाठी एकरकमी शुल्क भरण्याची सक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 07:08 AM2020-05-12T07:08:38+5:302020-05-12T07:09:17+5:30
गैरसोय होत असल्याचा परदेशातून आलेल्या नागरिकांचा आरोप, जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईतही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिकेने खबरदारी घेतली आहे. त्यामुळे परदेशातून येणाºया भारतीय नागरिकांना १४ दिवस क्वारंटाइन होणे सक्तीचे करण्यात आले आहे.
मुंबई : परदेशातून मायदेशी परतणाऱ्या २४६ मुंबईकरांना मुंबईतील विविध हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. मात्र हॉटेलमध्ये प्रवेश करताना १४ दिवसांचे शुल्क एकाच वेळी भरण्याची सक्ती हॉटेलमालक करीत असल्याचा परदेशातून आलेल्या नागरिकांचा आरोप आहे. मध्यरात्री एवढ्या मोठ्या रकमेची व्यवस्था करणे काही नागरिकांना शक्य होत नाही. तरीही पूर्ण रक्कम भरेपर्यंत त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्यात येत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईतही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिकेने खबरदारी घेतली आहे. त्यामुळे परदेशातून येणाºया भारतीय नागरिकांना १४ दिवस क्वारंटाइन होणे सक्तीचे करण्यात आले आहे. लंडनहून रविवारी मध्यरात्री मुंबईत आलेल्या विमानाने ३१९ प्रवासी मुंबईत उतरले. यापैकी २४६ मुंबईकरांना मुंबईतील ८८ हॉटेल्समध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. या रूम राज्य सरकारने निश्चित केलेल्या सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
हॉटेलमालक एकाच वेळी १४ दिवसांची रक्कम भरण्यास भाग पाडत आहेत. असाच कटू अनुभव लंडनहून मुंबईला आलेल्या वर्षा राऊत यांना रविवारी मध्यरात्री आला. आपल्या मुलीच्या प्रसूतीसाठी जानेवारी महिन्यात लंडनला गेलेल्या राऊत रविवारी मुंबईत परतल्या. मात्र विमानतळावरून त्यांना हॉटेलमध्ये सोडल्यानंतर हॉटेलमालकाने १४ दिवसांचे ७८ हजार रुपये भरा, अशी सक्ती केली. त्यांच्या क्रेडिट कार्डची वैधता संपलेली असल्याने त्यांनी १५ हजार रुपये भरून उर्वरित रक्कम सकाळी भरण्याची तयारी दाखवली. मात्र संबंधित हॉटेलमधून त्यांना पुन्हा विमानतळावर सोडण्यात आले. त्यानंतर त्या मध्यरात्री दुसºया पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्या. परंतु, तिथेही ७० हजार ५६० रुपये नातेवाइकांच्या मदतीने भरल्यानंतर त्यांना हॉटेलमध्ये सकाळी रूम मिळाली, असा त्यांचा आरोप आहे. पालिकेने याकडे लक्ष देऊन १४ दिवसांचे पैसे एकदम भरण्याची सक्ती करू नये, अशी सूचना हॉटेल मालकांना करावी, अशी विनंती राऊत यांनी केली आहे.
माहिती घेण्यात येईल
परदेशातून भारतात येतानाच नागरिकांना १४ दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाइन राहावे लागणार असल्याची कल्पना देण्यात येते. संबंधित प्रकरणाची माहिती घेण्यात येईल. त्यापूर्वी याबाबत काही भाष्य करणे योग्य ठरणार नाही.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त