मुंबई : पश्चिम उपनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर महापालिकेने सुरू केलेल्या ‘मिशन झिरो’ला अखेर यश मिळू लागले आहे. मालाड ते दहिसर या परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. तसेच रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही ५० दिवसांनी अधिक आहे. त्याचबरोबर गेल्या पंधरवड्यात पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. मुंबईतील प्रमुख हॉटस्पॉट असलेल्या वरळी, धारावी, भायखळा, कुर्ला या विभागात कोरोना जून महिन्यात नियंत्रणात आला. त्याच वेळी अंधेरी ते दहिसर या भागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येऊ लागले. त्यामुळे पालिका प्रशासनाने येते ‘मिशन झिरो’ ही मोहीम हाती घेतली. त्यानुसार पश्चिम उपनगरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये फिव्हर कॅम्प आयोजित करणे, घरोघरी जाऊन तपासणी करणे यावर भर देण्यात आला. गेल्या महिन्यात पुन्हा पश्चिम उपनगरातील काही इमारतींमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढली होती.दररोज सापडणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांपैकी ७० टक्के इमारतींमधील रहिवासी असल्याचे आढळून आले. त्यामुळे बाधित क्षेत्रांचे नियम कडक करण्यात आले. तसेच अँटिजन टेस्टद्वारे जास्तीत जास्त चाचणी करण्यास सुरुवात झाली. या काळात एकाच ठिकाणी दोन-तीन बाधित रुग्ण सापडल्यास संपूर्ण इमारत सील करण्यास सुरुवात केली. याचे चांगले परिणाम आता दिसून येत आहेत. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढलाया विभागात सध्या ६१ बाधित क्षेत्र आहेत. तर १२४० इमारती-इमारतीचे भाग सील करण्यात आले आहेत. पी उत्तर...मालाडमध्ये आतापर्यंत ७२६९ रुग्ण सापडले आहेत. यापैकी ५९३४ कोरोनामुक्त तर ३३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अद्याप १०१७ रुग्ण उपचार घेत आहेत. येथे १०६ दिवसांनंतर रुग्ण संख्या दुप्पट होत आहे. आर दक्षिण - कांदिवलीत आतापर्यंत ५४७१ रुग्ण सापडले आहेत. यापैकी ४२९० कोरोनामुक्त तर १७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अद्याप १००४ रुग्ण राहिले आहेत. ७२ दिवसांनंतर रुग्ण संख्या दुप्पट होत आहे. बोरीवलीमध्ये आतापर्यंत ५९९६ रुग्ण सापडले आहेत. ४४५४ कोरोनामुक्त झाले, १३४० सक्रिय रुग्ण आहेत. तर २०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ७२ दिवसांनंतर रुग्ण संख्या दुप्पट होत आहे. आर उत्तर - दहिसरमध्ये आतापर्यंत ३००० रुग्ण आढळले आहेत. यापैकी २३१९ बरे झाले. तर १२९ रुग्णांचा मृत्यू झाला आणि सध्या ५५२ रुग्ण सक्रिय आहेत. ७३ दिवसांनंतर रुग्ण संख्या दुप्पट होत आहे.
CoronaVirus News: मालाड ते दहिसर कोरोनामुक्तीकडे; महापालिकेच्या मिशन झिरोला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 1:35 AM