मुंबई - सेंट जाॅर्ज रुग्णालयातील दोन दिवसांपूर्वी ५२ वर्षीय कोरोना रुग्णाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. या रुग्णाच्या मृत्यूनंतर एका परिचारिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रुग्णालयातील परिचारिका अन्य सहकाऱ्यांसमोर कोरोना रुग्णाच्या हाताळणीचे, मृत्यूनंतरच्या प्रशिक्षणाचे आणि सुऱक्षा किट्सविषयीच्या गंभीर समस्येविषयी पोटतिडकीने संताप व्यक्त करीत होती. या व्हिडीओची गंभीर दखल घेत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांची तातडीने बदली करुन ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषधशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अशोक खोब्रागडे यांची पूर्ण वेळ अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडीओमध्ये परिचारिकेने रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. कोरोना रुग्णालय म्हणून घोषित केलेल्या या मुंबईतील रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोणतीही सुरक्षा नसल्याचे तिने उघडकीस आणले. तसेच, या कर्मचाऱ्यांना कोरोना कक्षात काम कऱण्याचे कुठलेही प्रशिक्षण दिले नसल्याचेही तिने स्पष्ट केले. कोरोना कक्षात काम कऱणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट्सची पुरेशी उपलब्धता नसून ते हाताळण्याचे प्रशिक्षण दिले नसल्याची उदासीनता तिने व्हीडीओमधून मांडली आहे. तसेच, कोरोना रुग्ण व त्याच्या मृत्यूनंतर असणाऱ्या प्रक्रियेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अलगीकऱणासाठी रुग्णालय प्रशासनास विनंती करावी लागल्याचे धक्कादायक वास्तव तिने व्हिडीओत मांडले आहे. या व्हिडीओवर चहूबाजूंनी टिका झाली, शिवाय कोरोनाशी फ्रंटफूटवर लढणाऱ्या योद्धांची हतबलता समाजासमोर आल्याने अखेरीस वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने याची गंभीर दखल घेऊन वैद्यकीय अधीक्षकांची तातडीने बदली केली आहे.
.........................
१८५ खाटांची रुग्णालयात व्यवस्था
सध्या सेंट जाॅर्ज रुग्णालयात कोरोनासाठी उपचार व विलगीकरण कक्ष सुरु आहे. यात १० अतिदक्षता विभाग, कोरोना रुग्णांसाठी ५० खाटा, संशयित रुग्णांसाठी १२५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.