मुंबई: मेट्रो कारशेडवरुन अश्विनी भिडे विरुद्ध शिवसेना असा वाद पेटला होता. आरेतील मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या शिवसेनेला अश्विनी भिडेंनी अप्रत्यक्षपणे अंगावर घेतलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रं स्वीकारताच अश्विनी भिडेंना मेट्रो-3 च्या संचालक पदावरुन हटवण्यात आलं. मात्र आता ठाकरे सरकारनं भिडेंकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.मेट्रोवरुन थेट शिवसेनेला भिडलेल्या अश्विनी भिडेंकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. त्यांना मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षात प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. आता त्यांच्याकडे कोरोनाच्या वॉररुमची जबाबदारी असेल. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन कक्षात कोरोना वॉर रुम तयार केली आहे. या वॉर रुमचं नेतृत्त्व भिडेंकडे सोपवण्यात आलं आहे. कोरोनाशी संबंधित नियोजनात्मक, प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचं काम त्यांच्याकडे असेल. कोरोना वॉर रुममधून प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.नोव्हेंबर अखेरीस उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतली. यानंतर पुढील महिन्यात ठाकरे सरकारनं अश्विनी भिडेंना प्रधान सचिवपदी बढती दिली. याशिवाय एमएमआरसीएल आणि मेट्रो-3 चं संचालकपदही त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आलं. आरे येथील मेट्रो-3 च्या कारशेडच्या मुद्द्यावरून अश्विनी भिडे आणि शिवसेना यांच्यात तीव्र मतभेद झाले होते. मात्र तरीही भिडे यांना पदोन्नती देण्यात आल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. २१ जानेवारीला ठाकरे सरकारनं २० अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. अश्विनी भिडेंना मेट्रो-३ च्या संचालक पदावरुन हटवलं गेलं. त्यांच्या जागी रणजितसिंह देओल यांची नेमणूक करण्यात आली. भिडे यांचा मेट्रो-३ च्या संचालक पदाचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये पूर्ण झाला होता. मात्र त्यांना सरकारकडून कार्यकाळ वाढवून देण्यात आला नाही. मात्र आता सरकारनं त्यांच्याकडे अतिशय महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
CoronaVirus: अश्विनी भिडेंकडे ठाकरे सरकारनं सोपवली महत्त्वाची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 5:10 PM