coronavirus: अश्विनी भिडे, संजीव जयस्वाल यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तपदाची सूत्रे, पदभार स्वीकारला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 07:06 AM2020-05-10T07:06:01+5:302020-05-10T07:13:06+5:30
मुंबईच्या अतिरिक्त आयुक्तपदी अश्विनी भिडे आणि संजीव जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी शनिवारी सकाळी आपला पदभार स्वीकारला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.
मुंबई : कोरोनाविरुद्ध सुरू असलेला लढा मजबूत करण्यासाठी काही सनदी अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती महापालिकेत करण्यात आली आहे. त्यानंतर आता अतिरिक्त आयुक्तपदी अश्विनी भिडे आणि संजीव जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी शनिवारी सकाळी आपला पदभार स्वीकारला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.
भारतीय सनदी सेवेतील १९९५ च्या तुकडीतील अधिकारी असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती पालिका मुख्यालयातील कोरोना वॉर रूममध्ये गेल्या महिन्यात करण्यात आली. कोरोनाशी संबंधित नियोजनात्मक, प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सात सनदी अधिकाºयांच्या पथकात भिडे यांचा समावेश करण्यात आला आहे. घाटकोपर, भांडुप, मुलुंड येथील रुग्ण संख्यावाढीचे प्रमाण कमी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे,
तर अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल हे भारतीय सनदी सेवेतील १९९६ च्या तुकडीचे अधिकारी असून त्यांनीही आतापर्यंत महत्त्वपूर्ण अशा विविध पदांवरचे काम पाहिले आहे. सहायक जिल्हाधिकारी नाशिक व तळोजा (जि. नंदुरबार), नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात उपसचिव, चंद्रपूर आणि औरंगाबाद जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, नागपूर महापालिकेचे आयुक्त, औरंगाबादचे विभागीय आयुक्त आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त म्हणून जयस्वाल यांनी काम पाहिले आहे.