Join us

CoronaVirus: ड्युटी फर्स्ट! व्हिडीओ कॉलिंगनं आजोबांचं अखेरचं दर्शन घेऊन 'त्या' लागल्या कामाला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 8:32 PM

पालिका सहाय्यक आयुक्तांचं सर्वत्र कौतुक

- मनोहर कुंभेजकरमुंबई- कोरोनाच्या विरोधात पालिका आयुक्त प्रवीण परदेशी, अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, २४ सहाय्यक आयुक्त अविरत काम करत आहेत. यापैकी आर मध्य वॉर्डच्या साहाय्यक आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांच्या कार्यक्षमतेचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. आजोबांच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवत कापसे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करत आहेत. त्यांनी व्हिडिओ कॉलिंगद्वारे बोरिवली पूर्व येथील त्यांच्या निवासस्थानातून आजोबांचे अखेरचे दर्शन घेतले. आपल्या अश्रूंद्वारे भावनांना वाट मोकळी करून देऊन कापसे लगेच नेहमीप्रमाणे कामालादेखील लागल्या.

सोशल डिस्टनसिंग आणि लॉकडाऊनमुळे यवतमाळला जाणे तर शक्य नाही. याशिवाय आर मध्य वॉर्डची साहाय्यक आयुक्त म्हणून सुरू असलेली कोरोना विरोधात लढाई यामुळे आजोबांचे व्हिडिओ कॉलिंगद्वारे अंतिम दर्शन घेऊन कापसे पुन्हा नेहमीप्रमाणे जोमाने कामाला लागल्या. यामुळे आमच्या अधिकाऱ्यांचेदेखील मनोबल उंचावले असून आम्हीही कोरोना विरोधात अविरत काम करत असल्याची माहिती येथील परिरक्षण खात्याचे सहाय्यक अभियंता राजेश अक्रे यांनी दिली.

भाग्यश्री कापसे यांचे आजोबा श्यामराव मारोतराव गुजरकर (वय ९९) यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील पिंपळगाव वोढाणा इथे वास्तव्यास होते. ते नकलाकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. मात्र संचारबंदीमुळे मुंबई, नागपूर, चंद्रपूर येथील त्यांचे नातेवाईक गुजरकर यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचू शकले नाही. या सर्वांनी व्हिडिओ कॉलिंगद्वारे श्यामरावांचे अंतिम दर्शन घेतले. अतिशय मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या