मुंबई : कोरोना विषाणूपासून रक्षण होण्यासाठी औषध म्हणून लसूण, आलं, तुळस, काळे मिरे, गोमूत्र, मध अशा पदार्थांचा वापर करण्याचा दावा करणारे वेगवेगळे मेसेज सध्या व्हायरल होत आहेत. यात वरील पदार्थांची नावे बदलून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत, पण आले, लसूण हा कोरोनावर उपचार नाही, असे मत आयुर्वेद तज्ज्ञांनी व्यक्त केले.कोरोना विषाणूबद्दल जगभरात चिंतेचे वातावरण असताना देशात मात्र अफवांचे पेव फुटले आहे. रोज नवनव्या अफवांनी फेसबुक, व्हॉट्सअॅपसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म भरून जात आहेत. काही व्हायरल मेसेजमध्ये लसूण, मध, आलं खाल्ल्याने कोरोनापासून बचाव केला जातो, असे दावे करण्यात येत आहे. मात्र, याबद्दल केंद्र सरकार, आयुष मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. आयुर्वेदिक, होमियोपॅथी आणि युनानी उपचारांनी कोरोना विषाणूवर उपचार केला जाऊ शकतो, असा दावा करणारे वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज सध्या सर्वच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल आहेत. कोणतीही खात्री न करता अनेक जण चुकीची माहिती पोस्ट आणि मेसेज फॉरवर्ड करत आहेत. यामुळे गैरसमज पसरत आहेत.याविषयी, रा.आ.पोदार वैद्यक महाविद्यालयाचे वैद्या तृष्णा बारमासे यांनी सांगितले, स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि रोगी व्यक्तीचा रोग दूर करणे हा आयुर्वेदाचा नियम आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रथिने, कार्बोदके, जीवनसत्वे आणि पाचक घटकांची शरीराला आवश्यकता असते. हे दैनंदिन आहारातून मिळत असतात. या अन्नपदार्थांमध्ये लसूण, आले, आवळा, दालचिनी, सुंठ, धणे, जिरे, ओवा, ज्येष्ठ मध, कापूर, हिंग, पपई, डाळिंब, चिकू, किवी, ताक, दही, तुळस, हळद, गूळवेल, मोहरी या अन्नपदार्थांचा समावेश आहे. हे अन्नपदार्थ योग्यरीत्या योग्य मात्रेत घेतल्यास व्याधीक्षमत्व व रोगप्रतिकारक शक्ती, पाचन शक्ती वाढण्यास मदत होते, रोग नष्ट होण्यास मदत होते.खप वाढलाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हायरल होणाऱ्या संदेशांमुळे आले, लसूण या पदार्थांच खप वाढलेला नाही. मात्र, मागील काही दिवसांत मांसाहाराचे सेवन सर्वसामान्यांनी कमी केल्यामुळे आले, लसूण या पदार्थांची विक्री अधिक होत आहे.- शंकर पिंगळे,एपीएमसी भाजी मार्केट संचालक
Coronavirus : आले, लसूण हा कोरोनावर उपाय नाही, आयुर्वेद तज्ज्ञांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 4:26 AM