Coronavirus:...अन् एका प्रवाशाच्या नाकातून रक्त यायला लागलं; राज्य सरकारचा भोंगळ कारभार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 08:01 AM2020-05-15T08:01:32+5:302020-05-15T08:03:12+5:30
Lockdown News: परदेशातून परत येणाऱ्या महाराष्ट्रीयन लोकांना देखील अशा विचित्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
अतुल कुलकर्णी
मुंबई : लंडन, अमेरिकेतून आलेल्या प्रवाशांना नॉन एसी गाडी पाठवल्यामुळे वाटेतच प्रवासी आजारी पडण्याचे प्रकार घडत आहेत. वारंवार सांगूनही मंत्रालयातील अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे.
लंडन, अमेरिकेमध्ये तापमान अत्यंत कमी आहे. विमानात २० तास एसी मध्ये प्रवास करून आल्यानंतर या प्रवाशांना विमानतळाच्या बाहेर पडायला सकाळचे दहा अकरा वाजत आहेत. त्यानंतर बाहेर आल्यानंतर बाहेरचे तापमान एकदम ३५ डिग्री पर्यंत गेलेले त्यांना आढळले. त्यातच साध्या नॉन एसी बस पाहून अनेक प्रवाशांनी विमानतळावरच तक्रारी करणे सुरू केले. आम्ही एसी गाडीचे पैसे द्यायला तयार आहोत, शिवनेरी सारखी एसी बस आम्हाला द्या, वाटेत कुठेही खायला मिळणार नाही. आमच्या कडून पैसे घ्या, पण आम्हाला खाण्याची सोय गाडीत करून द्या, अशी मागणी करूनही या प्रवाशांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक प्रवाशांनी विमानतळावर याची तक्रार केली. तरीही त्यांना साध्या गाडीतून मुंबई ते नागपूर, मुंबई ते सोलापूर असा बस प्रवास करावा लागला. आम्ही विमानाच्या तिकीटासाठी मोठी रक्कम मोजली, एसी गाडी साठी देखील आम्ही पैसे द्यायला तयार आहोत, असे सांगूनही या प्रवाशांना साध्या गाडीतून पाठवले गेले. यामुळे सोलापूरला जाणाऱ्या एका साध्या गाडीतील एक प्रवासी वाटेतच आजारी पडला. त्याच्या नाका तोंडातून उष्णतेमुळे रक्त येऊ लागले. त्यामुळे त्या प्रवाशाला वाटेतच ॲडमिट करावे लागले.
हाच प्रकार मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या बसच्या प्रवाशाच्या बाबतीत घडला. तो प्रवासी जळगावला आजारी पडला. त्याच्यामुळे इतर प्रवाशांना ही काही तास तेथेच थांबून राहावे लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरच्या प्रवाशांना एसी गाडीत पाठवा, ते पैसे भरायला तयार आहेत असे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगूनही काहीच फरक पडला नाही.
टोकाची थंडी आणि टोकाची उष्णता यामुळे हे प्रवासी आजारी पडत आहेत याकडे मुंबईचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांना विचारले असता ते म्हणाले आम्हाला जशा सूचना आहेत तसे आम्ही प्रवाशांना पाठवत आहोत यापेक्षा जास्त मी काही सांगू शकत नाही.
एकीकडे परप्रांतीय मजुरांच्या स्थलांतरामुळे समस्या बिकट होत असताना दुसरीकडे परदेशातून परत येणाऱ्या महाराष्ट्रीयन लोकांना देखील अशा विचित्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे.