coronavirus: निराधार हातांनी गमावला आर्थिक मदतीचा आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 07:50 AM2020-08-31T07:50:14+5:302020-08-31T07:51:46+5:30
युवा स्वप्न फाउंडेशन या संस्थेने सुरू केलेले मुंबईतील श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रम ज्यांचे कुणी नाही त्यांच्यासाठी आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचणी आल्या. मात्र, त्यावर त्यांनी जिद्दीने, एकमेकांच्या साथीने मात केली. इ
- सचिन लुुंगसे
मुंबई : कोरोनाने माणसाच्या आरोग्यावर आक्रमण केले, तर लॉकडाऊनने त्यांचा जगण्यासाठी आवश्यक असलेला आर्थिक कणाच मोडून टाकला. यामुळे सर्वच हतबल झाले. साहजिकच अनाथालय, वृद्धाश्रमात जगणाऱ्या अनेक निराधार हातांनीही आर्थिक मदतीचा आधार गमावला. त्यांना मिळणारी मदत ६० टक्क्यांनी घटल्यामुळे ४० टक्के मदतीवर दिवस ढकलणे त्यांच्यासाठी फारच अवघड झाले. जगण्यातील संघर्ष वाढला, तरीही त्यांची लढण्याची उमेद कायम आहे. त्यामुळेच या परिस्थितीवरही त्यांनी मात केल्याचे पाहायला मिळत आहे.
युवा स्वप्न फाउंडेशन या संस्थेने सुरू केलेले मुंबईतील श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रम ज्यांचे कुणी नाही त्यांच्यासाठी आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचणी आल्या. मात्र, त्यावर त्यांनी जिद्दीने, एकमेकांच्या साथीने मात केली. इतकेच नव्हे तर आता नवी उमेद घेऊन युवा स्वप्न फाउंडेशन या संस्थेने आश्रमाच्या कामाला सुरुवात केली आहे, असे युवा स्वप्न फाउंडेशनच्या संस्थापक राखी सूर्यकांत भिलारे यांनी सांगितले. नारायण सेवा संस्थानचे अध्यक्ष प्रशांत अग्रवाल म्हणाले की, आमचा आश्रम लहान मुलांचा आहे. आमच्याकडे साडेतीनशेहून अधिक मुले आहेत. कोरोनाकाळात रुग्णालये बंद होती. परिणामी, या काळात शस्त्रक्रिया झाल्या नाहीत. लहान मुलांच्या शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. कोरोना, लॉकडाऊनच्या काळात ज्या अडचणी आल्या त्या सोडविताना केवळ आम्हीच नाही, तर बहुतांश आश्रमांनी आपला खर्च कमी करण्यावर भर दिला.
जय हरी युवा फाउंडेशनच्या अध्यक्षा कल्याणी पवार म्हणाल्या, मुळात मुंबईत म्हणजे कल्याणपर्यंत वृद्धाश्रम किंवा अनाथालये फार कमी आहेत. बहुतांश आश्रम मुंबईबाहेर म्हणजे पुण्याजवळ आहेत. मुंबई असो किंवा पुणे, कोरोनामुळे इतरांप्रमाणेच अनाथालये आणि वृद्धाश्रमांनाही मोठा आर्थिक फटका बसला. मात्र, समाजानेही जमेल तशी आर्थिक मदत सुरूच ठेवली. आम्ही त्यांच्यावर भार आहोत, असे कधीच जाणवू दिले नाही. आम्ही कोणाकडेच मदत मागितली नाही. लोकांनी स्वत:हून मदत केली. जय हरी युवा फाउंडेशनच्या द्वारका वृद्धाश्रमातही अनेक वृद्ध आयुष्याची संध्याकाळ एकमेकांच्या आधाराने जगत आहेत. कोरोनामुळे मदतीचा ओघ कमी झाला असला तरी अजूनही काही जण जमेल तशी मदत न मागता स्वत:हून करीत आहेत, असे या फाउंडेशनच्या अध्यक्षा कल्याणी पवार यांनी सांगितले.
आता लॉकडाऊन शिथिल होत असल्याने सर्वांचा दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होईल. आर्थिक घडीही पूर्वपदावर येईल. लोक पुन्हा स्वत:हून सढळ हस्ते आर्थिक मदत करतील, असा विश्वास या संस्थांना आहे. (समाप्त)
साधना, योगासनांवर भर
जीवनसंध्या मांगल्य संस्थान संचालित मातोश्री वृद्धाश्रम यांनाही आर्थिक अडचणींसह इतरही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र त्यावर सर्वांनी मिळून संयमाने मात केली, असे खजिनदार नितीन कोठारी यांनी सांगितले. वृद्धाश्रम अधिकाधिक स्वच्छ ठेवण्यात येत आहे. कोरोनामुळे बाहेरील व्यक्तींना आत प्रवेश नाकारण्यात आला आहे. आश्रमामध्ये आलेली प्रत्येक गोष्ट स्वच्छ करण्यात येते. जंतुनाशकांची फवारणी होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी योगासने, साधना आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.