CoronaVirus News: केईएम रुग्णालयात ४८ ज्येष्ठ नागरिकांना ‘बीसीजी’चा डोस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 03:34 AM2020-10-05T03:34:00+5:302020-10-05T03:34:51+5:30
CoronaVirus News प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ठरणार फायदेशीर
मुंबई : पालिकेच्या केईएम रुग्णालयात ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीच्या प्रयोगाप्रमाणे दुसऱ्या बाजूला बीसीजी लस चाचणीचा प्रयोगही सुरू आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना असून, सध्या अशाच व्यक्तींना केईएम रुग्णालयात ही लस देण्यात येत आहे. त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याचे काम सध्या सुरू आहे.
कोरोनाविरोधात शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी बीसीजी लसीकरणाचा प्रयोग महापालिकेच्या केईएम रुग्णालयात सुरू झाला असून, आतापर्यंत ४८ ज्येष्ठ नागरिकांना याचे लसीकरण करण्यात आले आहे. ही लस छातीतील संसर्ग प्रतिबंधित करत असून, कोरोना छातीतील संसर्ग असल्याने ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यासाठी किती प्रमाणात फायदेशीर होईल, याची चाचणी केली जात आहे.
केईएम रुग्णालयात बीसीजी लसीच्या प्रयोगाला एका महिन्यापूर्वी सुरुवात झाली असून, पुढचे चार महिने हा प्रयोग सुरू राहणार असल्याचे डॉ.हेमंत देशमुख यांनी सांगितले. या प्रयोगाचा कालावधी सहा महिन्यांचा असेल. ६० ते ७५ वयोगटांतील ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्यात येत आहे. लस देण्यात येणाºया ज्येष्ठ नागरिकाला कोणताही गंभीर आजार असू नये, अशी अट आहे.
कोविशिल्ड वॅक्सिन ट्रायलप्रमाणेच ही बीसीजी वॅक्सिन ट्रायल आहे. या डोसनंतर दर आठवड्याला टेलिमेडिसिनद्वारे दोन महिने सतत फॉलोअप घेतला जातो. त्यानंतर दोन आणि सहा महिन्यांनंतर रक्त तपासणी केली जाते. बीसीजी चाचणी छातीतील कोणत्याही संसर्गावर काय परिणाम करते, हे तपासले जाते. बीसीजी लसीद्वारे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवते.