Coronavirus: बेस्टचे कर्मचारी कोरोनामुक्त; तिघा जणांना डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 02:44 AM2020-05-03T02:44:25+5:302020-05-03T02:44:48+5:30
नऊ कर्मचाऱ्यांवर अद्याप उपचार सुरू
मुंबई : कोरोनाची लागण झाल्यामुळे गेले १३ दिवस रुग्णालयात उपचार घेत असलेला बेस्ट उपक्रमातील आणखी एक कर्मचारी बरा झाला आहे. आतापर्यंत बेस्टच्या १३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी तीन कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित नऊ जणांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी २४ मार्चपासून मुंबईत रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र पाणी, वीजपुरवठा, आरोग्य अशा अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने यासाठी काम करणाºया कर्मचाºयांना बेस्ट उपक्रमाने मोठा दिलासा दिला आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ३१०० बसगाड्या आहेत. यापैकी दररोज सरासरी १३०० बसगाड्या रस्त्यावर धावत आहेत. मात्र यामुळे बेस्ट वाहक आणि चालकांना कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.
आतापर्यंत सात बसवाहक, चार बसचालक, विद्युत विभाग आणि परिवहन, अभियांत्रिकी विभागातील दोन कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी दोन कर्मचारी आतापर्यंत बरे झाले आहेत. तर १८ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बसवाहकाला शनिवारी १३ दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. या बसवाहकाला मधुमेहाचा त्रास आहे.
वडाळा आगारातील विद्युत पुरवठा विभागातील एका कर्मचाºयाचा काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
परळ येथील बेस्ट वसाहतीत राहणाºया बसवाहकाची मुलगी, जावई आणि नातीला कोरोनाची लागण झाली होती. यामुळे ते राहत असलेल्या इमारतीत प्रवेश बंद करण्यात आला. मात्र त्या वाहकाची पत्नी, मुलगा आणि त्यांचा स्वत:चा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. बाधित कर्मचाºयांच्या संपर्कात आलेल्या २३६ कर्मचाºयांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. यापैकी कोरोनाची लक्षणे न आढळलेले शंभर कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.