Join us

Coronavirus: गर्दी कराल तर खबरदार! दिसाल तिथं होणार अँटिजेन चाचणी, महापालिकेचं 'मिशन टेस्टिंग'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 2:43 AM

बस डेपो, खाऊगल्ली, चाैपाट्यांवर माेफत अँटिजेन चाचणी, मॉलमध्ये मात्र पैसे द्यावे लागणार

मुंबई : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाधित रुग्णांचा शोध घेण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. त्यानुसार मॉल, लांबपल्ल्याची रेल्वे स्थानके, एस. टी. बस डेपो, खाऊगल्ली, पर्यटनस्थळ, सरकारी कार्यालये, बाजारपेठ, फेरीवाले, चौपाट्या आदी ठिकाणी दररोज नागरिकांची रॅपिड अँटिजेन चाचणी केली जाईल. यासाठी प्रत्येक ठिकाणाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. मात्र, मॉलमधील चाचणीचा खर्च संबंधित नागरिकाला करावा लागेल तर चाचणीला नकार देणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पालिकेने चाचणीचे प्रमाण दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दररोज ५० हजार चाचण्या केल्या जातील. या चाचण्या पालिकेच्या केंद्रांव्यतिरिक्त गर्दीच्या ठिकाणीही केल्या जातील. या चाचण्यांसाठी नागरिकांची परवानगी आवश्यक नसून, नकार देणाऱ्या व्यक्तीवर साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. या संदर्भातील नियमावली आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी शनिवारी जाहीर केली.

माॅलमध्ये राेज ४०० जणांची चाचणीप्रत्येक मॉलमध्ये दररोज ४०० लोकांची चाचणी केली जाईल. चाचणीचा खर्च संबंधित व्यक्तीने देणे बंधनकारक आहे. त्यामुळे खर्च देण्यास नकार देणाऱ्या ग्राहकांवर साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. लांबपल्ल्याची रेल्वे स्थानके तसेच एस. टी. बसस्थानकांवर किमान एक हजार प्रवाशांची दररोज चाचणी केली जाईल. विभाग स्तरावरील गर्दीच्या ठिकाणी दररोज किमान एक हजार चाचण्या उदा. रेस्टॉरंटमधील कर्मचारी आणि ग्राहक, खाऊगल्ली, फेरीवाले, बाजारपेठ, पर्यटनस्थळे, चौपाट्या तसेच अन्य गर्दीच्या ठिकाणी चाचणी केल्यास त्याचा खर्च महापालिका करणार आहे.

ठिकाण    संख्या    चाचण्यांचे प्रमाण (दररोज)मॉल्स    २७    १०,८००रेल्वे स्थानक    ९    ९०००एस. टी. बस डेपो    ४    ४००० गर्दीची ठिकाण    २४    २४०००विभाग स्तरावर         ४७,८०० 

येथे हाेणार चाचण्याछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल, दादर पश्चिम आणि मध्य, अंधेरी, बोरिवली, वांद्रे टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस - कुर्ला.मुंबई सेंट्रल, परळ, बोरवली, कुर्ला, एस. टी. बसस्थानक. 

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिका