मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. यातच मुंबईतील लोकल प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय कारणास्तव प्रवास करणारे नागरिक वगळता 22 मार्च ते 31 मार्च पर्यंत इतर कोणताही प्रवासी लोकलमधून प्रवास करू शकत नाही. मध्य, पश्चिम आणि हाबर रेल्वे मार्गावरील लोकलची गर्दी टाळण्यासाठी सामान्य प्रवाशांच्या प्रवासास बंदी घालण्यात आली आहे. कोकण विभागाचे विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी हे आदेश दिले आहे.
शासकीय अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय कारणास्तव प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे ओळखपत्र आणि अधिकृत कागदपत्रे तपासली जातील. यासाठी प्रत्येक स्टेशनच्या पुर्व-पश्चिमेकडे मुख्य प्रवेशद्वारावर प्रत्येकी एक पथक नियुक्त करण्यात येणार आहे. या पथकात पाच व्यक्तींचा समावेश असतील. यामध्ये एक शासकीय रेल्वे पोलीस, एक रेल्वे पोलीस, दोन महसुल विभागाचे प्रतिनिधी, एक वैद्यकीय कर्मचारी यांचा समावेश असेल.
ज्यांचा अत्यावश्यक सेवेशी संबंध नाही. अशा लोकांनी रेल्वेने अनावश्यक प्रवास टाळावा त्यांना रेल्वे स्थानकांवर प्रवेश दिला जाणार नाही. अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांची शासकीय ओळखपत्र, नियुक्ती आदेशाच्या आधारे खात्री करून प्रवास करता येणार आहे. महानगरपालिका आणि नगरपालिकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना यासंदर्भातील माहिती कळविण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सांगितले आहे. खासकरून मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथे 31 मार्चपर्यंत खासगी ऑफिस आणि दुकाने बंद राहणार आहे. मात्र, यादरम्यान अत्यावश्यक सेवा म्हणजेच बँका, सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठा, किराणा मालाचे दुकान, दुधाचे दुकान, रुग्णालये, छोटे रेस्टॉरंट सुरु राहणार आहेत.
चीनमधील व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 335 पर्यंत पोहोचली आहे. भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही रोज वाढत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून कोरोनाग्रस्तांची संख्या आतापर्यंत 64 वर पोहोचली.