Coronavirus: रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक सरसावले, कोरोनाच्या लढाईत कोटींची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 12:11 PM2020-03-30T12:11:30+5:302020-03-30T12:13:16+5:30
राज्यातील अनेक संस्था आणि मंदिर ट्रस्ट कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपलं आर्थिक योगदान देत आहेत.
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊच्या काळात राज्यातील जनतेला घरातच बसण्याचे आवाहन केले आहे. सरकार लोकांची मदत करत आहे तुम्हीही सरकारला सहकार्य करा, कोरोनाशी लढण्यासाठी वेगळं खातं उघडलं आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत वेगळा विभाग केला आहे. उदय कोटक यांनी १० कोटींचा निधी जाहीर केला. अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे येऊन मदत करतायेत. सध्याच्या घडीला कोणताही देश मदतीसाठी पुढे येणार नाही. त्यामुळे आपणच एकत्र मिळून संकटाला मात करणं गरजेचे आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. उद्धव ठाकरेंच्या या आवाहनला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्ष असलेल्या रयत शिक्षण संस्थेने प्रतिसाद देत, कोरोनाच्या लढाईत आपलं योगदान दिलंय.
राज्यातील अनेक संस्था आणि मंदिर ट्रस्ट कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपलं आर्थिक योगदान देत आहेत. श्री सिद्धिविनायक ट्रस्ट आणि श्री शिर्डी साई संस्थानकडून कोट्यवधींचा निधी कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यात आला आहे. तर, रयत शिक्षण संस्थेनेही पुढाकार घेत आपलं योगदान दिलं आहे. कोरोनाच्या लढाईसाठी कोटी रुपयांचा निधी देणारी रयत शिक्षण संस्था ही राज्यातील पहिली संस्था ठरलीय. रयत शिक्षण संस्थेकडून कोरोनाच्या लढाईसाठी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये २ कोटी रुपायांची मदत देण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊँटवरुन याबाबत माहिती दिली.
राष्ट्रीय महत्त्वाच्या कोणत्याही प्रसंगी ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या संस्था नेहमीच पुढे आल्या आहेत. परंतु संपूर्ण #lockdown मुळे रोग निवारण कामी शिक्षण संस्थांना सक्रिय होता येत नाही.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 30, 2020
'या परिस्थितीत सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून रयत शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या एक दिवसाच्या वेतना इतकी सुमारे दोन कोटी रुपये रक्कम धनादेशाद्वारे 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड-१९' मध्ये जमा करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला आहे.', असे पवार यांनी आपल्या ट्विटरवरुन सांगितलंय.
दरम्यान, ज्या देशांनी काळजी घेतली नाही त्यांची दुर्दैवी अवस्था आहे. पण संकट भयंकर असताना जीवाची बाजी लावून लढणाऱ्या डॉक्टरांचा अभिमान आहे. सर्व डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले. तसेच, आपल्याला जो वेळ मिळाला त्यानुसार आपण काळजी घेतली आहे, परराज्यातील काही मजूर गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत त्यांना विनंती आहे कुठेही जाऊ नका, जिथे आहात तिथे राहा, तुमची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे. राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करतोय. काही रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये वर्दळ होत आहे त्याठिकाणी कृपा करुन गर्दी करु नका अन्यथा लोक ऐकणार नसतील तर सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील असा इशारा त्यांनी दिला.